लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड: येथील तहसील प्रशासनाने गुरुवारी गोदावरी नदीकाठावर १५ ते २० वाळूचे साठे जप्त केले आहेत. दरम्यान, हे वाळूसाठे जमविण्यासाठी गर्दभांचा वापर केल्याची माहिती पुढे आली आहे.नदीपात्रातून उपसा केलेली वाळू वाहनाच्या सहाय्याने आतापर्यंत वाहून नेली जात होती. अशी चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूलचे पथक कारवाई करीत असल्याने वाळू माफियांनी वाळू चोरीसाठी आता गर्दभांचा वापर सुरु केल्याचे समोर येत आहे. गंगाखेड शहराजवळून वाहणाºया गोदावरी पात्रातील वाळूची चोरी सहजासहजी लक्षात येऊ नये, या उद्देशाने गाढवांच्या सहाय्याने या वाळूची वाहतूक होत आहे. शहराजवळूनच गाढवांवरुन आणलेली वाळू एका ठिकाणी साठा करुन ठेवली जात आहे. नदीकाठावर अवैध साठे करुन ते वाहनधारकांना विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्याने उपविभागीय अधिकारी विश्वांभर गावंडे, तहसीलदार जीवराज डापकर यांच्या आदेशावरुन २६ जुलै रोजी नायब तहसीलदार गणेश चव्हाण, मंडळ अधिकारी शंकर राठोड, तलाठी शिवाजी मुरकुटे, चंद्रकांत साळवे, सुनील मुलंगे, लिपीक सुनील चाफळे यांनी कारवाई केली. नदीकाठावर साठविलेले १५ ते २० वाळूसाठे जप्त करण्यात आले. साधारणत: २५ ब्रास वाळू प्रशासनाने जप्त केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरातही ही वाळू साठविण्यात आली आहे.सोनपेठमध्ये ट्रॅक्टर पकडलेसोनपेठ - तालुुक्यातील डिघोळ येथील वाण नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन त्याची वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर २६ जुलै रोजी महसूलच्या पथकाने पकडले आहे.डिघोळ येथील वाण नदीच्या घाटावरुन अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती महसूल प्रशासनच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथक डिघोळ येथे गेले असता एक ट्रॅक्टर वाळूची अवैध वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. हे ट्रॅक्टर पथकाने जप्त केले असून पंचनामा केला आहे. जप्त केलेले ट्रॅक्टर ट्रॉली सोनपेठ पोलिसांकडे स्वाधीन करण्यात आली आहे. ही कारवाई मंडळ अधिकारी देवेंद्र चंदेल, तलाठी परमानंद जमशेटे, एकलिंगे, पोलीस कर्मचारी राजू घरजाळे आदींनी केली.
परभणी : वाळू चोरीसाठी जिल्ह्यात होतोय गर्दभांचाही वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:50 AM