लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : देशातील वन व आदिवासी भागात नैसर्गिक लाख व डिकांचे उत्पादन पारंपरिक पद्धतीने घेतले जाते. कच्च्या मालाच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळते. मात्र लाख व डिंकावर प्रक्रिया करुन मूल्यवर्धित पदार्थ विक्री केल्यास निश्चितच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास रांची येथील नैसर्गिक लाख व डिंक संस्थेचे संचालक डॉ.के.के. शर्मा यांनी व्यक्त केला.येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय नैसर्गिक लाख व डिंक काढणी, प्रक्रिया व मूल्यवर्धन जोडणी प्रकल्प आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या रांची येथील भारतीय नैसर्गिक लाख व डिंक संस्थेच्या वतीने परभणीत १९ व २० नोव्हेंबर रोजी अकरावी वार्षिक कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ.शर्मा बोलत होते.या प्रसंगी कुलगुरू डॉ.अशोक ढवण, संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, रांची येथील प्रकल्प समन्वयक डॉ.निरंजन प्रसाद, प्राचार्य डॉ.अरविंद सावते, डॉ.राजेश क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ.ढवण म्हणाले, आज प्रक्रियायुक्त अन्न पदार्थांत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक लाख व डिंकाचा उपयोग होत आहे. गवार पीक हे कमी पाण्यावर येणारे व पाण्याचा ताण सहन करणारे पीक असून, मराठवाड्यात गवार बियाणांच्या उत्पादनास वाव आहे. गवार बियांचा डिंक तयार करण्यास उपयोग होतो. या डिंकाचा वापर विविध खाद्य पदार्थ तसेच औषधी, कागद, सौंदर्यप्रसाधने उद्योगात होतो. या दुर्लक्षित पीक लागवडीस मराठवाड्यातील कोरडवाहू शेतीत वाव आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ.निरंजन प्रसाद यांनी नैसर्गिक लाख व डिंक यावरील देशात सुरू असलेल्या संशोधनाबाबत आढावा सादर केला. संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ.अनुप्रिता जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.राजेश क्षीरसागर यांनी आभार मानले. कार्यशाळेत देशातील नऊ राज्यातील शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. हे शास्त्रज्ञ नैसर्गिक लाख, गवार डिंक या पिकाची काढणी, प्रक्रिया व मूल्यवर्धन यावरील संशोधनाचे निष्कर्ष सादर करुन संशोधनाची दिशा निश्चित करणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.दिलीप मोरे, डॉ.हेमंत देशपांडे, डॉ.के.एस. गाडे, डॉ.बी.एस. आगरकर, डॉ.पी.यु. घाटगे, डॉ.एस.के. सदावर्ते, डॉ.एस.पी. म्हेत्रे, डॉ.दिनेश चौहान, डॉ.व्ही.एस. खंदारे, डॉ.जी.एम. माचेवाड, डॉ.बी.ए. जाधव, डॉ.विजया पवार, चंद्रलेखा भोकरे, अमोल खापरे, शिवकुमार सोनकांबळे, बी.एम. पाटील आदींनी प्रयत्न केले.
परभणी :मूल्यवर्धित पदार्थांतून वाढेल उत्पन्न- के.के. शर्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:58 PM