लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी तासिका तत्वावर अध्यापनाचे काम करणाऱ्या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला असून याचा मराठवाड्यातील २ हजार २५२ जणांना लाभ मिळणार आहे.राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयात तासिका तत्वावर काम करणाºया प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक महिन्यांपासून होती. त्या अनुषंगाने निर्णय मात्र केला जात नव्हता. राज्य शासनाने यापूर्वी ५ नोव्हेंबर २००८ मध्ये या संदर्भात निर्णय घेऊन या प्राध्यापकांना प्रति तास दर ठरविले होते. वाढत्या महागाईमध्ये हे दर कमी असल्याने या प्राध्यापकांमध्ये नाराजीचा सूर होता. त्या अनुषंगाने राज्य विधीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात आ.विक्रम काळे, आ.सतीश चव्हाण यांनी या संदर्भातील प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला होता. त्यावेळी या प्रकरणी कारवाई सुरु असल्याची माहिती उच्चतंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात दिली होती. त्यानंतर शासनाने आता या प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा आदेश उच्चतंत्र शिक्षण विभागाने नुकताच काढला आहे. तासिका तत्वावर काम करणाºया अध्यापकांना कला, वाणिज्य व विज्ञान विषयाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी प्रति तास ३०० रुपये आणि प्रात्याक्षिकांसाठी १५० रुपये मानधन देण्यात येत होते. आता नव्या आदेशानुसार त्यांना वर्गावरील तासिकेसाठी ५०० रुपये आणि प्रात्याक्षिकांसाठी २०० रुपये देण्यात येणार आहेत. कला, वाणिज्य, विज्ञानच्या पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पूर्वी सैध्दांतिकसाठी प्रति तास ३०० रुपये आणि प्रात्याक्षिकांसाठी १५० रुपये मानधन देण्यात येत होते. आता सैद्धांतिकसाठी प्रति तास ६०० रुपये आणि प्रात्याक्षिकांसाठी २५० रुपये मानधन देण्यात येणार आहे. शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षण, विधी या अभ्यासक्रमासाठी पदवी व पदव्युत्तरकरीता सैध्दांतिकसाठी प्रति तास ३०० रुपये आणि प्रात्याक्षिकासाठी १५० रुपये मानधन देण्यात येत होते. आता प्रति तास ६०० रुपये आणि प्रात्याक्षिकासाठी २५० रुपये मानधन देण्यात येणार आहे. यासाठी काही अटीही घालून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नवीन दर मंजुर करीत असताना तासिका तत्वावरील अध्यापकांची नियुक्ती करण्यापूर्वी विभागीय सहसंचालक यांच्या कार्यालयाकडून संबंधित विषयाचा कार्यभार स्वीकारुन नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. एका पूर्णवेळ पदाकरीता दोन तासिका तत्वावरील अध्यापकांच्या नियुक्त्या करता येतील. एका अध्यापकाकडे जास्तीत जास्त ९ तासिकांचा कार्यभार सोपविता येईल. संस्थेने विद्यापीठ मान्यतेने जाहिरात देऊन विद्यापीठ अनुदान आयोग/ शिखर संस्था/ शासन यांनी वेळोवेळी विहित केलेली शैक्षणिक अर्हता व पात्रताधारक अध्यापकांची निवड समितीमार्फत करावी. ज्यामध्ये संस्थाप्रमुख, प्राचार्य, विभागप्रमुख व एक बाह्यविषय तज्ज्ञ असावा, असेही या संदर्भातील आदेशात नमुद करण्यात आले आहे. तासिका तत्वावरील अध्यापकांची एका शैक्षणिक वर्षासाठी जास्तीत जास्त ९ महिन्यांकरीता तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करावी. त्यास विद्यापीठाची मान्यता घ्यावी. त्यानंतर ही नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल, असेही याबाबतच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.राज्यातील ९ हजार १६५ : अध्यापकांना फायदाराज्याच्या उच्चतंत्र शिक्षण विभागाने तासिका तत्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा राज्यातील ९ हजार १६५ अध्यापकांना लाभ होणार आहे. त्यामध्ये मराठवाड्यातील २ हजार २५२ अध्यापकांचा समावेश आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील ४४४, जालना जिल्ह्यातील ११२, परभणी जिल्ह्यातील २४०, बीड जिल्ह्यातील ३१२, उस्मानाबाद जिल्ह्यातील १८१, नांदेड जिल्ह्यातील ५३०, लातूर जिल्ह्यातील ३८०, हिंगोली जिल्ह्यातील ५३ अध्यापकांचा समावेश आहे. राज्यभरात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे तब्बल ९२६ अध्यापकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.फक्त एकाच महाविद्यालयात करता येणार कामतासिका तत्वावरील नियुक्तीही तात्पुरत्या स्वरुपाची असल्याने त्यास नियमित सेवेचे कोणतेही लाभ प्राप्त होणार नाहीत. त्यामुळे भविष्यात सेवेत कायम करण्याची मागणी/नियमित सेवेच्या कोणत्याही हक्काची मागणी करणार नाही. तसेच त्यास एकाच वेळी महाविद्यालयात काम करता येईल, असे १०० रुपयांच्या टॅम्पपेपरवर हमीपत्र संबंधित अध्यापकांकडून रुजू होते वेळेस घेण्यात यावे, असे आदेश या विभागाने संबंधित महाविद्यालयांना दिले आहेत.
परभणी : २२५२ अध्यापकांना मानधनवाढीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:10 AM