परभणी : पशूवैद्यक पदवी असलेल्या उमेदवारांनाच पशूधन विकास अधिकारी या पदावर पदोन्नती द्यावी या प्रमुख मागणीसाठी येथील पशूवैद्यक व पशूविज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बेमुदत बंदचे आंदोलन पुकारले आहे. महाविद्यालयास कुलूप ठोकून दोन दिवसांपासून हे विद्यार्थी आंदोलनात उतरले आहेत.
शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात पशूवैद्यक आणि पशूविज्ञान महाविद्यालयासमोर हे आंदोलन केले जात आहे. आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी गुरुवारी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर एल.एस.एस. हा कोर्स पूर्ण पशू पर्यवेक्षक म्हणून नियुक्त झालेल्या उमेदवारांनाच पशूधन विकास अधिकारी या पदावर पदोन्नती दिली जात आहे. शासनाच्या या धोरणाला विद्यार्थ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे पशूवैद्यकीय पदवी प्राप्त असलेल्या उमेदवारांनाच पशूधन विकास अधिकारी या पदावर पदोन्नती द्यावी, तसेच राज्यात पशूधन विकास अधिका-याच्या सुमारे ६०० जागा रिक्त आहेत. त्या तत्काळ भराव्यात, अशी मागणी करीत हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
याच मागणीसाठी सोमवारपासून येथील पशूवैद्यक विद्यार्थ्यांनी महाविद्यालय बंद ठेवले आहे. भारतीय पशूवैद्यक कायद्यानुसार पदवीधर उमेदवारांच पशूधन विकास अधिकारी पदासाठी पात्र असल्याचे म्हटले आहे. मात्र कायदा डावलून पशूपर्यवेक्षकांमधून पशूधन विकास अधिकारी पदावर पदोन्नती दिली जात आहे, यास आमचा विरोध आहे, असे पशूवैद्यक विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.पांडुरंग घुगे यांनी सांगितले. या आंदोलनात सुमारे ४०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
पहा व्हिडीओ :