लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध ६० गुन्ह्यांची नोंद केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी पी. शिव शंकर व पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली.जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात शनिवारी सायंकाळी ६ वाजता प्रचार तोफा थंडावल्या आहेत. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरु झाला आहे. जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे पथक स्थापन करुन आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्न केले. जिंतूर विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाचे १७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये मालमत्तेच्या विरुपण कायद्यांतर्गत ३, परभणी विधानसभा मतदारसंघात १, गंगाखेड विधानसभा मतदारसंघात ७, अनधिकृत रॅली काढणे, सभा घेण्याच्या कारणावरुन गंगाखेड, परभणी आणि जिंतूर या तिन्ही मतदारसंघात प्रत्येकी तीन गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच मोटार वाहन अधिनियमानुसार २९ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये जिंतूर ४, परभणी ६, गंगाखेड १७ आणि पाथरी मतदारसंघात २ गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलीस अधिनियमानुसार ५ गुन्हे दाखल झाले असून ते सर्व जिंतूर मतदारसंघातील आहेत. तसेच इतर ६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. याशिवाय पोलीस प्रशासनाने अवैध दारु विक्रीच्या गुन्ह्यांसह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या आहेत.पावणेपाच लाखांचा ऐवज जप्त४आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करीत असताना प्रशासनातील विविध पथकांनी आतापर्यंत ४ लाख ७९ हजार ९५२ रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. जिंतूर मतदारसंघात २ लाख २१ हजार २२२ रुपयांचा, परभणी मतदारसंघात ९ हजार रुपये, गंगाखेड मतदारसंघात ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यामध्ये एक बुलेट मोटारसायकल, तीन मोटारसायकल, मोबाईल, घड्याळ आदी साहित्याचा समावेश आहे.पावणेबारा लाखांची दारु जप्त४जिल्हा प्रशासनातील विविध पथकांनी कारवाई करीत आतापर्यंत ११ लाख ७५ हजार ६४९ रुपयांची दारु जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये एसएसटी व एफएसटी पथकाने ५५ हजार ३२८ रुपयांची, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १०२ प्रकरणांमध्ये ७ लाख ११ हजार ७७९ रुपयांची पोलीस प्रशासनाने १०० प्रकरणांमध्ये ४ लाख ८ हजार ५२४ रुपयांची दारु जप्त केली आहे.
परभणी : आचारसंहिता भंगाचे जिल्ह्यात ६० गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:40 PM