लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : ३ कोटी ७० लाख रुपये खर्च करून शहरामध्ये ग्रामीण रुग्णालयासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला आहे; परंतु, या इमारतीचे उद्घाटन न झाल्याने रुग्ण व नातेवाईकांमधून संताप व्यक्त होत आहे.सोनपेठ तालुक्यात एकूण ६५ गावे आहेत. या गावांतील रुग्णांच्या उपचारासाठी सोनपेठ शहरात १ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तर तालुक्यातील शेळगांव, वडगांव, डिघोळ ई, शिर्शी बु., लासीना, कान्हेगाव, खडका, नरवाडी, आवलगाव, उखळी बु,. धामोनी या ठिकाणी १० उपकेंद्र आहेत. या या उपकेंद्रातून रूग्णांना प्राथमिक उपचार मिळतो. गंभीर रूग्णांना मात्र उपचारासाठी परळी, अंबेजोगाई व परभणी सारख्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे सोनपेठ तालुक्यात रूग्णांसाठी एक ग्रामीण रुग्णालय व्हावे, या मागणीसाठी येथील राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी अनेकवेळा शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजविले. अंदोलनेही केली. त्याच बरोबर सततच्या पाठपुराव्यामुळे येथील जनतेची मागणी पूर्ण करुन शासनाने सोनपेठ तालुक्यासाठी शहराच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय मंजूर केले. यासाठी ३ कोटी ७० लाख रुपये खर्च करुन सर्व सोयीसुविधांयुक्त इमारत उभी केली. कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये लवकरच रुग्णांना उपचार मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, इमारतीचे बांधकाम होऊन वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मात्र या इमारतीचे उद्घाटन झाले नाही. विशष म्हणजे ग्रामीण रुग्णालयासाठी लागणारी पदनियुक्तीही अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे रुग्णालयासाठी बांधण्यात आलेली ही इमारत केवळ शोभेची वास्तू म्हणून उभी राहणार आहे की काय? असा प्रश्न सोनपेठ तालुक्यातील रुग्ण व नातेवाईकांना पडला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन या इमारतीचे उद्घाटन करून रुग्णांसाठी खुली करावी, अशी मागणी होत आहे.
परभणी: रूग्णालय उद्घाटनाच्या प्रतिक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:14 AM