लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : येथील बसस्थानक परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्तीची कामे प्रलंबित आहेत. पावसाळा सुुरु झाला की स्थानक परिसरात पाण्याचा डोह साचून प्रवाशांची गैरसोय होते. दरवर्षी हा प्रश्न ऐरणीवर येतो. मात्र याबाबत ठोस कारवाई केली जात नसल्याने समस्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.पाथरी शहरात मध्यवर्ती ठिकाणी बसस्थानक आहे. बसस्थानकाच्या समोरील भागात संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे. स्थानकात प्रवेशासाठी दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत. माजलगावकडून येणाऱ्या गाड्यांसाठी स्थानकात प्रवेश करण्यासाठी असलेल्या रस्त्यावर सतत पाण्याचा डोह साचतो. हा रस्ता दुरुस्त करण्यात येत नसल्याने बसचालकांसह प्रवाशांचीही गैरसोय होते. त्याचबरोबर बसस्थानकाच्या मोकळ्या जागेत परभणी आणि माजलगावाकडून येणाºया बसेस उभ्या केल्या जातात. मात्र एक पाऊस पडला की हा परिसर पाण्याने पूर्णत: भरला जातो. यामुळे स्थानकात प्रवेश करण्यासाठी पाण्याचा डोह ओलांडून जावे लागते. तसेच गाड्या लावण्याच्या ठिकाणी पाणी साचत असल्याने अनेक वेळा धावत्या बसमुळे प्रवाशांच्या अंगावर चिखलफेक होते. येथील बसस्थानकाच्या या समस्येबाबत अनेक वेळा प्रवाशांनी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रारी केल्या. मात्र या तक्रारीकडे संबंधित विभागाने लक्ष दिले नाही.सध्या अवकाळी पाऊस सुरू असून थोडा पाऊस पडला की, स्थानकात पाणी साचत आहे. या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
परभणी : बसस्थानक परिसरात दुरुस्तीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:24 AM