लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुदखेड ते मनमाड या मार्गावरील दुहेरीकरणाचा एक टप्पा असलेल्या परभणी-मुदखेड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम सप्टेंबर महिन्यापर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने वर्तविला आहे़ दुहेरीकरणाचा हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतुकीला गती मिळणार आहे़मुदखेड ते मनमाड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे खात्याने मंजुरी दिली आहे़ त्यातील मुदखेड ते परभणी या मार्गाच्या दुहेरीकरणासाठी ३९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला़ ८१़४३ किमी अंतराचे हे काम सुरू झाले असून, त्यातील परभणी ते मिरखेल (१६ किमी), मुदखेड ते मुगट (१० किमी) आणि लिंबगाव ते नांदेड- मालटेकडी (१६ किमी) या ४२ किमी अंतरावर प्रत्यक्ष दुहेरी मार्गाचा वापर सुरू झाला आहे़ या मार्गावरील लिंबगाव ते मिरखेल हे ३०़८४ किमी अंतराचे काम शिल्लक आहे़ सध्या हे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले असून, ते सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे़ त्याचप्रमाणे मालटेकडी ते मुगट हे १० किमी अंतराचे कामही सुरू असून, जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करणार आहे़दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील परभणी ते मुदखेड या दुहेरीकरणाच्या कामाचा अंतीम टप्पा सुरू झाला आहे़ हे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतुकीची गती वाढणार आहे़ त्यातून प्रवाशांना सुविधा उपलब्ध होतील़ तसेच नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यासाठीही दुहेरीकरण मार्गाचा फायदा या भागातील प्रवाशांना होणार आहे़ सध्या तरी हे काम प्रगतीपथावर असून, साधारणत: आणखी चार महिने रेल्वे प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागेल़ हा संपूर्ण मार्ग दुहेरीकरण झाल्यास प्रवाशांचा वेळ वाचणार आहे़१८ पुलांची झाली उभारणीपरभणी ते मुदखेड या ८१़४३ किमी अंतरावर दुहेरी रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले आहे़ साधारणत: डिसेंबर २०१७ मध्ये या कामाला सुरुवात झाली़ या मार्गावर एकूण २५ पूल बांधण्याचे प्रस्तावित होते़ त्यापैकी असना नदीवरील पूल आणि पूर्णा शहराजवळ असलेल्या पूर्णा नदीवरील मोठ्या पुलांचे काम शिल्लक आहे़ तसेच एकूण ५ छोटे पूलही बांधण्याचे काम शिल्लक असून, आतापर्यंत १८ पूल बांधकाम पूर्ण झाले आहे़नांदेड विभागातील मुदखेड ते मनमाड या मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाला रेल्वे प्रशासनाने मंजुरी दिली आहे़ त्यापैकी परभणी ते मुदखेड या मार्गाचे प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे़ तर परभणी ते मनमाड या मार्गाच्या दुहेरीकरणाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, दुहेरीकरणासाठी लागणारा खर्च, कामाचा आराखडा आदी कामे शिल्लक आहेत़ मुदखेड ते मनमाड या संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यास या मार्गावर रेल्वे वाहतूक वाढण्यास मदत होणार आहे़ रेल्वेच्या विकासातही भर पडणार आहे.सद्यस्थितीला परभणी ते मुदखेड दरम्यानचे पूल उभारणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे़ या मार्गावरील पूर्णा नदीवरील आणि असना नदीवरील पूल हे सर्वात मोठे काम आहे़ या दोन्ही पुलांचे सांगाडे सद्यस्थितीला उभे करण्यात आले असून, उर्वरित कामेही सुरू झाली आहेत़ पूल उभारणे हा या मार्गावरील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे़ पुलांची उभारणी पूर्ण झाल्यास पुढील कामाला गती मिळून लवकरच हा मार्ग दुहेरी वाहतुकीसाठी खुला होण्याची अपेक्षा रेल्वे प्रशासनाने वर्तविली़
परभणी : रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी सप्टेंबरअखेरपर्यंतची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:16 AM