लोकमत न्यूज नेटवर्कपालम :सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेतील पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मोफत गणवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. गणवेशासाठी लागणारी रक्कमच शिक्षणाधिकाऱ्यांकडे वर्ग झाली नसल्याने गणवेश खरेदीसाठी जुलै महिना उजाडण्याची शक्यता आहे.शिक्षण विभागाने २०१७ मध्ये गणवेश खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याची पद्धत अवलंबविली होती. मात्र बँक खाते उघडण्यापासून जमा झालेली रक्कम उचलण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी गणवेशाची रक्कम खर्च होऊ शकली नव्हती. २०१८ मध्येही अशीच स्थिती होती. मात्र डेबीट प्रणाली प्रमाणे विद्यार्थ्यांच्या थेट खात्यावर रक्कम जमा करण्याच्या प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीकडे रक्कम वर्ग करण्याची पद्धत यावर्षी अंमलात आणली जात आहे. तालुक्यातील ७१ शाळांतील जवळपास ६ हजार ५०० विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. सामूदायिकरित्या गणवेश खरेदीचा मार्ग सुकर झाल्याने या रक्कमेतून गणवेश खरेदी करावयाचा आहे. मात्र शाळा सुरू होण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असून अद्याप गणवेश खरेदीसाठी निधीही उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. त्यामुळे मोफत गणवेशासाठी विद्यार्थ्यांना किमान एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.पाठ्यपुस्तके मात्र मिळणार पहिल्याच दिवशी४शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळणार नसला तरी पाठ्यपुस्तक वाटपाचे काम मात्र पूर्ण झाले आहे. बालभारती पाठ्यपुस्तक महामंडळाकडून पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. मराठी आणि सेमी माध्यमाच्या ११ हजार ४१६ आणि ऊर्दू माध्यमाच्या १२२१ अशा १२ हजार ६३७ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके वितरित केली जाणार आहेत.४यासाठी ७५ हजार पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली आहेत. आतापर्यंत मानवत, कोल्हा, केकरजवळा, मंगरूळ, सावरगाव केंद्रातील शाळांना पुस्तक वाटपाचे काम पूर्ण झाले आहे.शासनाच्या योजनेनुसार जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थिनी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश पुरविला जातो. या गणवेश योजनेसाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध झाला नसल्याने नव्या नियमाप्रमाणे हा निधी शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यावर वर्ग करता आला नाही. रक्कम उपलब्ध झाल्यानंतर तातडीने व्यवस्थान समित्यांना गणवेशासाठी निधी दिला जाईल.-संजय ससाणे,गटशिक्षणाधिकारी, मानवत
परभणी : मोफत गणवेशासाठी करावी लागेल प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:22 AM