लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): झरी लघू तलावातील शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत मोटारी जप्त केल्याचा राग मनात धरून मानवत शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन ठिकाणी फोडल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्याचबरोबर हजारो लिटर पाण्याची गळती होत आहे. या प्रकरणी झरी येथील दोघांवर मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.मानवत तालुक्यातील झरी येथील लघू तलावातील उपलब्ध पाणीसाठा कमी असल्याने पाणीपुरवठा विभागाने शेतकऱ्यांना सूचना देऊन विद्युत मोटारी काढण्याचे आवाहन करूनही काही शेतकºयांनी पाणी उपसा सुरुच ठेवला होता. यामुळे मागील आठवड्यात नगरपालिका प्रशासनाने कारवाई करीत दोन शेतकºयांच्या विद्युत मोटारी जप्त केल्या. त्याच बरोबर १५ मे रोजी प्रशासनाने पुन्हा कारवाई करीत अजून दोन मोटारी जप्त केल्या. प्रशासनाने केलेल्या कारवाईचा राग मनात धरून विनायक सत्वधर व विलास सत्वधर यांनी मानवत शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन दोन ठिकाणी फोडल्याची तक्रार पाणीपुरवठा अधिकारी प्रताप चव्हाण यांनी दिली. याच तक्रारीवरून मानवत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, १७ मे रोजी सकाळी पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी फोडलेली पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी गेले होेते. यावेळी एका ठिकाणी दुरुस्ती केल्यानंतर अन्य एका ठिकाणी पाईपलाईन फोडल्याचे आढळून आले. फोडलेल्या पाईपलाईनमधून हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत वेळ लागू शकतो. या प्रकारामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून काही भागात आठ ते दहा दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला परिणाम४झरी येथील तलावातून मानवत शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या तलावात एक महिना पुरेल एवढाच पाणीसाठा असल्याने पालिकेकडून तलावातून पाण्याचा अवैध उपसा करणाºया विद्युत मोटारी जप्त केल्या. कारवाईचा राग मनात धरून झरी येथून आलेली जलवाहिनी दोन ठिकाणी फोडण्यात आली. त्याचबरोबर खोडसाळपणे काही जण विद्युत पुरवठाही बंद करीत आहेत. त्याचबरोबर पालिकेने हाती घेतलेल्या एक्सप्रेस फिडरचे कामही काही जणांनी अडथळा आणून बंद पाडले होते. याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला असल्याने शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे अशा घटनांना रोखण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे केली आहे.
परभणी:जलवाहिनी फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:56 PM