लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी): जालना जिल्ह्यासह परभणीतील प्रमुख शहरांची तहान भागविणाऱ्या निम्न दूधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर सिंचनासाठी पाणी उपसा झाल्याने प्रकल्पात केवळ ६़३७ टक्केच जीवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे़ त्यामुळे आगामी काळात पाणीपुरवठा करण्यासाठी मृतसाठ्यातूनच पाणी उचलण्याची वेळ येऊन ठेपली आहे़जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा व १७५ गाव पाणीपुरवठा योजनांसह परभणी जिल्ह्यातील सेलू शहर, ८ गाव पाणीपुरवठा योजना आणि इतर शहरांसाठी निम्न दूधना प्रकल्पातून टंचाईच्या काळात पाणीपुरवठा करण्यात येतो़ मात्र दूधना प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा असल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे़ यंदा अत्यल्प पावसामुळे निम्न दूधना प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला नाही़ त्यातच परतूर आणि मंठा तालुक्यातील पिकांसाठी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा झाल्याने प्रकल्पाची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली आहे़ त्यामुळे जून २०१९ पर्यंत प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्यासाठी संबंधित यंत्रणेची तारांबळ उडणार आहे़ गतवर्षी निम्न दूधना प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाल्यानंतर प्रकल्पातून नदीपात्राद्वारे परभणी, पूर्णा व नांदेड शहराला पाणी देण्यात आले होते़ तसेच सिंचनासाठीही दोन्ही कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले़ परंतु, यंदा दुष्काळ असल्याने प्रकल्पातील पाण्याचा काटकसरीने वापर होईल, अशी अपेक्षा होती़ मात्र बुडीत क्षेत्रातील शेत शिवारात पाणी उपसा झाल्याने प्रकल्पातील जीवंत पाणीसाठा जेमतेम राहिला आहे़ आॅक्टोबर महिन्यापर्यंत दूधना प्रकल्पात एकूण १४७ दलघमी पाणीसाठा झाला होता़ त्यातील ४४ दलघमी जीवंत पाणीसाठा होता़ जो की १८ टक्के होता़ मात्र त्यानंतरही प्रकल्पातून पाण्याचा उपसा झाला़ परिणामी सद्यस्थितीत प्रकल्पाचा पाणीसाठा ६़३७ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे़ आगामी सहा महिने प्रकल्पातून मंठा, परतूर, सेलू व परभणी तसेच इतर पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणी उपसा होणार आहे़ सद्यस्थितीत उपलब्ध पाणी आणि लागणारे पाणी यात तफावत निर्माण झाल्याने प्रकल्पाच्या मृतसाठ्यातून पाणी उचलण्याची वेळ पाणीपुरवठा योजनांवर येणार आहे़ जालना जिल्ह्यातील परतूर, मंठा व १७५ गाव पाणीपुरवठा योजनेसाठी जालना जिल्हाधिकाºयांनी ८ दलघमी पाणी आरक्षित केले आहे़ तर सेलू, आठ गाव पाणीपुरवठा व इतर गावांसाठी परभणी जिल्हाधिकारी यांनी ३़३ दलघमी पाणीसाठा आरक्षित केला असला तरी उपलब्ध जीवंत साठा आणि लागणरे पाणी यात जवळपास ४ टक्क्यांची तफावत निर्माण होत आहे़ त्यामुळे प्रकल्पाच्या मृतसाठ्यावर उन्हाळ्याच्या शेवटी परभणीसह जालना जिल्ह्यातील गावांची मदार असणार आहे़ डिसेंबर महिन्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेऊन रबी हंगामातील उभ्या पिकांसाठी व जनावरांच्या चारा पिकांसाठी प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते़ दोन्ही कालव्याच्या टेलपर्यंत पाणी पोहचविताना पाटबंधारे विभागाची चांगलीच कसरत झाली होती़ या दोन्ही कालव्यात तब्बल १० दलघमी पाणी सोडण्यात आले होते़ त्यामुळे प्रकल्पात सद्यस्थितीत एकूण पाणीसाठा ११८ दलघमी असून, यातील जीवंत साठा १५़४३ दलघमी एवढा आहे़जूनपर्यंत लागणार : १० टक्के पाणी४आॅक्टोबर महिन्यापासूनच अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ अत्यल्प पावसामुळे पाणीपुरवठा करणाºया विहिरी कोरड्या पडल्या आहेत़ परिणामी पाण्याचे स्त्रोत आटत चालल्याने अनेक गावांमध्ये आगामी काळात भिषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे़ सेलू शहरासह आठ गाव पाणीपुरवठा योजना प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहेत़४येलदरी प्रकल्पही मृतसाठ्यात असल्याने परभणी शहराला पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत आटत आले आहेत़ म्हणून दूधना प्रकल्पाच्या पाण्याच्या पर्याय प्रशासनाकडून नेहमीच राखून ठेवलेला असतो़ मात्र यंदा दूधना प्रकल्प मृतसाठ्यात जाण्याची शक्यता आहे़ त्यामुळे नदीपात्रात पाणी सोडणे अवघड आहे़ परभणी व जालना जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी जूनपर्यंत १० टक्के पाणी लागणार आहे़ मात्र सध्या जीवंतसाठा ६ टक्क्यांवर असल्याने मृतसाठ्यातूनच तहान भागवावी लागणार आहे़
परभणी : मृतसाठ्यातून उचलावे लागणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:10 AM