लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : पुढील दीड वर्षानंतर शहरात भूमीगत गटार योजनेचे काम करण्यात येणार आहे़ त्यावेळी सिमेंट रस्ते तोडावे लागतील़ त्यामुळे या पुढील काळात शहरात सिमेंट ऐवजी डांबरी रस्ते तयार करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त रमेश पवार यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली़परभणीच्या मनपा आयुक्तांचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रमेश पवार यांनी भविष्य काळात करण्यात येणाऱ्या कामकाजाविषयीची माहिती दिली़ यावेळी बोलताना पवार म्हणाले की, डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत ‘अमृत’ पाणी पुरवठा योजनेचे काम संपणार आहे़ त्यानंतर शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू होणार आहे़ त्यावेळी रस्ते खोदावे लागतील़ त्यामुळे आतापासून शहरात सिमेंट ऐवजी डांबरी रस्ते तयार करण्यात येतील़ शहरातील रस्त्यांचा प्रश्न या माध्यमातून सोडविण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले़ भूमिगत गटार योजनेचा प्लॅन तयार करण्याचे काम सुरू असून, याबाबतचा प्रस्ताव लवकरच शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल, असेही त्यांनी सांगितले़ सिमेंट रस्त्याएवेजी डांबरी रस्ते तयार करण्याचा निर्णय घेण्याबाबत काही राजकीय दबाव आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी केला असता त्यांनी याला नकार देत हा आपलाच निर्णय असल्याचे सांगितले़परभणी शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा दर आठवड्याला आपण स्वत: आढावा घेत आहे़ डिसेंबर २०१९ अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले़ शहराला सध्या १० ते १२ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे़ यात सुधारणा कधी होणार? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, त्यांनी शहरात पाण्याची साठवण क्षमता कमी आहे़ त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे़ राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे काम आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले़ अमृत योजनेतील कामेही वेगाने सुरू असल्याचे ते म्हणाले़ शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करणे, वृक्ष लागवड करून सुंदर व स्वच्छ शहर करणे, प्रमुख पदांवर कायमस्वरुपी कर्मचाºयांची नियुक्ती करणे याबाबींना आपले प्राधान्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले़शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते शाही मशिद या दरम्यानच्या रस्त्याचे काम कधी पूर्ण होईल, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी केला असता, लवकरच पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले़ कालावधी मात्र त्यांनी सांगितला नाही़ वीज बिल घोटाळा, बचत भवनच्या जागेतील साहित्य नेण्याचे प्रकरण याविषयावर मात्र त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही़
परभणी शहरात आता चकचकीत रस्ते बनणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:07 AM