लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): ऊसतोड कामगार घेऊन जाणाऱ्या टेम्पोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बोअरवेलच्या गाडीला जोराची धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली असून, तीन जण जखमी झाले. ही घटना २४ आॅक्टोबर रोजी पहाटे सोनपेठ फाट्यावर घडली.सेनगाव तालुक्यातील ऊसतोड मुकदम रमेश शंकरराव चव्हाण हे आयशर ट्रकने (एम.एच.०४/जीसी ९८५७) लिंगधारी (ता.सेनगाव) तसेच सेनगाव, गडदगव्हाण (ता.जिंतूर) येथील १८ ऊसतोड मजूर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील साखर कारखान्यावर घेऊन जात होते. २४ आॅक्टोबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पाथरी- माजलगाव रस्त्यावर शहरापासून एक कि.मी. अंतरावरील सोनपेठ फाट्यावर उभ्या असलेल्या बोअरवेल गाडीला (के.ए.०१/ए८७८७) या आयशरची जोराची धडक बसली. या अपघातात गंगाराम सदाशिव चव्हाण, बबिता गंगाराम चव्हाण, धीरज गंगाराम चव्हाण (सर्व रा.लिंगदरी) आणि गोकर्णा आश्रोबा चव्हाण हे जखमी झाले. सर्व जखमींना पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गंभीर जखमी गोकर्णा आश्रोबा चव्हाण (२७) या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी उल्हास रामधन राठोड या ऊसतोड मजुराच्या फिर्यादीवरुन टेम्पो चालक रवि जाधव याच्याविरुद्ध पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
परभणी : टेम्पोच्या धडकेने महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:36 AM