लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : रोजगार हमी योजना, रेशनचे धान्य व पीक विमा, दुष्काळी उपाययोजना तत्काळ राबवाव्यात, या मागणीसाठी शहरातील महिलांनी जागतिक महिला दिनी सोनपेठ तहसील कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केले.शहरातील जिजाऊ बगीचापासून या सत्याग्रह मोर्चाला सुरुवात झाली. पुढे अण्णाभाऊ साठे चौक, शिवाजी चौक या मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांच्या वतीने सोनपेठ तालुक्यात रोहयोची कामे सुरू करावीत, खरीप हंगामातील पीक विमा द्यावा, निराधारांचे त्रुटीमधील प्रस्ताव निकाली काढावेत, चारा छावण्या सुरू कराव्यात, ग्रामीण रुग्णालय सुरू करावे आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार अशिष बिरादार यांना देण्यात आले. या मोर्चात कॉ. राजन क्षीरसागर, माणिक कदम, शिवाजी कदम, मुरली पायघन यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
परभणी: महिलादिनी महिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 12:28 AM