लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी): तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सोमवारी शहरातील महिलांनी मोर्चा काढून तहसीलदारांना साकडे घातले.यावर्षी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. तसेच शेतातील कामेही ठप्प झाली आहेत. त्यामुळे सोनपेठ शहरातील महिलांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत असून उदरनिर्वाह भागविणे कठीण जात आहे. त्यामुळे तालुक्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्याची मागणी महिलांकडून केली जात आहे. या मागणीसाठी शहरातील गणेशनगर येथून महिलांनी १० डिसेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.या मोर्चात शहरातील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. तहसील कार्यालयाच्या परिसरात मोर्चा आल्यानंतर महिलांनी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनावर सुशीलाबाई काटे, गिरजाबाई सरवदे, गवळण गांगर्डे, चंद्रकला देवरे, यमुनाबाई बरवे, मुक्ताबाई राऊत, सत्यभामा मस्के, शोभा मस्के, मीना मस्के, वर्षा नवघरे या महिलांच्या स्वाक्षºया आहेत.मनरेगाची कामे ठप्प४सोनपेठ तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे, सिंचन विहीर यासह वैयक्तिक लाभाची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर आहेत; परंतु, जिल्हा परिषद, पंचायत समिती व कृषी विभागाच्या उदासिन भूमिकेमुळे तालुक्यात कामे ठप्प पडली आहेत. विशेष म्हणजे दुष्काळामुळे तालुक्यातील शेतीशी निगडीत कामे ठप्प पडल्याने तालुक्यातील मजुरांना मनरेगामधून कामे उपलब्ध करून देणे अपेक्षित असताना याकडे मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने महिलांना रोजगारासाठी मोर्चा काढावे लागत आहेत.
परभणी : तहसीलवर धडकला महिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 1:18 AM