लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २४ जानेवारीपासून सीएए, एनआरसी कायद्याच्या विरोधात सुरू केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनामध्ये शनिवारी जिल्हाभरातील महिलांनी सहभाग नोंदवून या कायद्याला विरोध दर्शविला.केंद्र शासनाच्या सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात शाहीन बागच्या धरतीवर परभणीत १५ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे़ या आंदोलनात शहरातील विविध भागातील नागरिक दररोज सहभाग नोंदवत आहेत़ विशेष म्हणजे महिलांचा सहभागही उत्स्फूर्त असून, शासनाने संविधान विरोधी कायदे रद्द करावेत, अशी मागणी केली जात आहे़ शनिवारी महिलांनी या आंदोलनात सहभाग नोंदवित दोन्ही कायद्यांना कडाडून विरोध केला़ यावेळी आंदोलकांना मार्गदर्शन करताना अनेक महिलांनी राष्टÑीय नागरिकता नोंदणी (एनपीआर) देशात केली जात आहे. ती पूर्वीप्रमाणे होत असली तरी या नोंदणीला संविधानाच्या विरोधात जावून कायद्याचे रुपांतर करु नये़ सीएए, एनआरसी हे कायदे रद्द करण्याची मागणी केली. ८ फेब्रुवारी रोजी डॉ. जाकीर हुसेन ज्युनिअर कॉलेज, पाडेला ज्युनिअर कॉलेज, मासूम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी मलेका गफार, सामाजिक कार्यकर्त्या कॉ. माधुरी क्षीरसागर, नगरसेवक पठाण नाजमीन शकील मोहियोद्दीन, द्वारकाबाई कांबळे, छायाताई बलखंडे आदींची उपस्थिती होती. गत तीन आठवड्यांपासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर शहर व जिल्ह्यातील महिला, पुरुषही रोजच्या रोज आंदोलनात सहभाग नोंदवित आहेत.
परभणी : सीएएच्या विरोधातील बेमुदत आंदोलनात महिलांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2020 12:27 AM