लोकमत न्यूज नेटवर्कपालम (परभणी): तालुक्यातील पालम ते धानोरा काळे या रस्त्यावर गोदावरीनदीच्या पात्रातील नवीन पुलाच्या कामाची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे आगामी काळात डिग्रस बंधाऱ्यातील पाणी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मदत होणार आहे.पालम - ताडकळस रस्त्यावर धानोरा काळे गावानजीक गोदावरीच्या पात्रात जुना पूल आहे. हा पूल मागील अनेक वषार्पूर्वी बांधण्यात आला होता. पूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर या बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. मागील सात वर्षांपासून बंधाºयात पाणी अडविण्यात येत आहे. शंभर टक्के पाणी अडविल्यास जुन्या पुलावर चार फूट पाणी येत असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद पडत होती. परिणामी डिग्रस बंधाºयात जेमतेम ७४ टक्के पाणी साठवण करता येऊ लागले. त्यातच या बंधाºयातील पाणी नांदेडला सोडण्यात येत असल्याने डिग्रस बंधारा कोरडाठक पडतो. त्यामुळे नेहमीच प्रशासन व स्थानिकांत पाण्याच्या प्रश्नावर वाद निर्माण होत आहेत. हा वाद कमी करण्यासाठी पुलाची उंची वाढविणे किंवा नवीन पूल बांधकाम करणे हे दोनच पर्याय शासनापुढे उभे होते. जुन्या पुलाची उंची वाढविणे शक्य नसल्याने अखेर जुन्या पुलाच्या पश्चिमेकडील बाजूस नवीन पुलास शासनाने मंजुरी दिली.या कामासाठी २४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून हे काम औरंगाबाद येथील खासगी कंपनीला सुटले आहे. सदर कंत्राटदाराने पुलाच्या कामासाठी कार्यवाही सुरु केली असून पुलाकरीता खोदकाम सुरू केले आहे.
परभणी: धानोरा काळे येथील गोदावरी पुलाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2019 11:11 PM