लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : परभणी- पाथरी या राष्ट्रीय महामार्गावर मानवतरोड रेल्वेस्टेशन ते परभणी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मागील काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र रस्त्याच्या कडेला खोदकाम केल्यानंतरही ही कामे वेळेत पूर्ण केली जात नसल्याने हा रस्ता अपघाताला निमंत्रण देणारा ठरू लागला आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे.राष्टÑीय महामार्ग २२२ हा कल्याण ते निर्मल तयार होत आहे. बीड जिल्ह्यातील गढी फाटा ते माजलगाव- पाथरी- मानवतरोड रेल्वेस्टेशनपर्यंत रस्त्याचे काम एल अॅन्ड टी कंपनीने जवळपास पूर्ण केले आहे; परंतु, या रस्त्यावर असलेल्या ढालेगाव येथील गोदावरीच्या पात्रातील पूल आणि मानवतरोड रेल्वे स्थानक परिसरातील उड्डाणपुलाचे काम अद्यापही अपूर्णच आहे. सेलू कॉर्नर परिसरातील दुभाजकाचे कामही संथ गतीने सुरू आहे. पाथरी ते परभणी हा ४० कि.मी. अंतराचा रस्ता आहे. पाथरीपासून मानवतरोड रेल्वेस्टेशनपर्यंत १७ कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. मात्र मानवतरोड रेल्वेस्टेशनपासून परभणी शहरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम मागील सहा महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. विशेष म्हणजे मानवतरोड ते परभणीपर्यंतच्या रस्त्याच्या कडेला खोदकाम करून काही ठिकाणी भराव टाकण्यात आला आहे. तर काही ठिकाणी खोदकाम करून भराव टाकण्यात आला नसल्याने वाहनधारकांना वाहने चालविताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे छोट्या-अपघातांनाही सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याच्या कंत्राटदाराने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन या रस्त्याच्या कामाची गती वाढविण्यास संबंधित कंत्राटदाराला आदेशित करावे, अशी मागणी वाहनधारकांमधून केली जात आहे.
परभणी : राष्टÑीय महामार्गाचे काम संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:49 PM