लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील येलदरी, मासोळी, करपरा हे प्रकल्प तुडुंब भरले असून ढालेगाव व मुद्गल बंधाऱ्यातही मूबलक पाणीसाठा झाला आहे. गंगाखेड जवळील गोदावरी नदीवरील मुळी बंधाºयाला दरवाजे नसल्याने येथे फक्त ९ टक्केच पाणीसाठा राहिला आहे.जिल्ह्यात यावर्षी परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. परिणामी पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मि.मी. असताना आतापर्यंत ८२७ मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश लघु व मध्यम प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. याला निम्न दुधना प्रकल्प अपवाद ठरला आहे. परतीच्या पावसात नेहमीच तुडंूब भरणारा हा प्रकल्प यावर्षी मात्र २० टक्के देखील भरलेला नाही. या प्रकल्पात ७ नोव्हेंबरपर्यंत फक्त १७.४१ टक्के पाणीसाठा होता. विशेष म्हणजे या प्रकल्पानेच गेल्या तीन वर्षात जिल्ह्याला बºयापैकी तारले होते. आता मात्र हा प्रकल्प ३० टक्के तरी भरेल की नाही, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे. सर्वात समाधानाची बाब म्हणजे गोदावरील नदीवरील पैठण येथील जायकवाडी प्रकल्प १०० टक्के भरला असून माजलगाव प्रकल्पातही ८९.८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे पाणी जिल्ह्यासाठी अनेकवेळा वरदान ठरले आहे. त्यास भरीस भर येलदरीची पडली आहे. मराठवाड्यातील मोठया धरणांपैकी एक असलेल्या येलदरी प्रकल्पात सद्यस्थितीत ९५.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पूर्णा नदीवरील खडकपूर्णा धरण १०० टक्के भरले. त्यामुळे या धरणाचे दरवाजे उघडल्याने येलदरी धरणात हे पाणी दाखल झाले. त्यामुळे परभणी शहरासह अनेक शहर व गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न किमान दोन वर्षे तरी मिटला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने सुटकेला नि:श्वास टाकला आहे. येलदरी व्यतिरिक्त गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पही शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गंगाखेड शहरासह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दोन वर्षासाठी सुटला आहे.मानवत तालुक्यातील झरी प्रकल्पातही ९६ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मानवत शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिंतूर तालुक्यातील करपरा मध्यम प्रकल्पातही ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे बोरी या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, येलदरी, मासोळी, करपरा, झरी आदी प्रकल्पांमध्ये मूबलक पाणीसाठा झाला असला तरी सिद्धेश्वर प्रकल्पात १७.६३ टक्के पाणीसाठा आहे. या शिवाय गंगाखेड शहराजवळील मुळी बंधाºयात केवळ ९.४४ टक्के पाणी राहिले आहे. या बंधाºयाला दरवाजे नसल्याने येथून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. येथील बंधाºयाला दरवाजे बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून ग्रामस्थांकडून केली जात असताना संबंधित विभागाला याकडे पाहण्यास वेळ नाही. गेल्या चार वर्षात समाधानकारक पाऊस नसल्याने हा बंधारा कोरडा होता. यावर्षी चांगला पाऊस झाला. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई जाणवू नये, यासाठी येथे पाणीसाठा करण्याच्या दृष्टीकोनातून बंधाºयास दरवाजे बसविणे आवश्यक होते; परंतु, त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे पहावयास मिळाले. परिणामी आता हा बंधाºयातील पाणीसाठा आता तळाला गेला आहे.गतवर्षीच्या : तुलनेत वाढला पाणीसाठा४गतवर्षी येलदरी प्रकल्पात फक्त ८.९१ टक्के पाणी होते. निम्न दुधना प्रकल्पातही गतवर्षी फक्त १७.४१ टक्के तर मासोळी प्रकल्पात २ टक्के पाणी होते. ढालेगाव बंधारा कोरडा होता.४तर मुद्गल बंधाºयात ३९ टक्के आणि डिग्रस बंधाºयात ५२ टक्के पाणी होते. करपरामध्यम प्रकल्पात मात्र गेल्या वर्षी ६२ टक्के आणि झरी येथील प्रकल्पात ८० टक्के पाणीसाठा होता.डिग्रस, मुद्गल, ढालेगाव बंधाºयात मूबलक पाणी४पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयात सद्यस्थितीत ८१.३४० टक्के पाणीसाठा आहे. पाथरी तालुक्यातील ढालेगाव बंधाºयात ७३.९३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर मुद्गल बंधाºयात ९०.२४० टक्के पाणीसाठा राहिला आहे. या तिन्ही बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असल्याने परिसरातील पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
परभणी : येलदरी, मासोळी, प्रकल्प तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2019 11:35 PM