लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणीसह नांदेड व हिंगोली जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणाच्यापाणीसाठ्यात दीड महिन्यामध्ये १३ टक्क्यांनी घट झाली आहे. जानेवारी महिन्यात १०० टक्के भरलेल्या या धरणात २३ फेब्रुवारी रोजी ८७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. याच झपाट्याने कमी झाले तर भविष्यात टंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण परभणीसह शेजारच्या जिल्ह्यांसाठी वरदान ठरले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे ८ वर्षापासून या धरणात पुरेसा पाणीसाठा झाला नाही. त्यामुळे टंचाईची तीव्रता वाढत गेली. मात्र मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या धरणात १०० टक्के पाणीसाठा झाला, ही जिल्हावासियांसाठी समाधानाची बाब ठरली. विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात सिद्धेश्वर धरणही १०० टक्के भरले होते. या धरणातील पाणी कालव्यातून सोडून देण्यात आले. सिद्धेश्वर धरणातील ७० टक्के पाणी कालव्यातून सोडल्यानंतर आता येलदरी धरणातून दररोज ४.५ दलघमी वीज निर्मिती केंद्रातून सिद्धेश्वर धरणात सोडले जात आहे. या प्रकल्पातून येलदरीचे पाणी नांदेड जिल्ह्यात नेले जात असल्याने जिंतूर तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कुठलेही कारण नसताना सिंचनाच्या नावाखाली येलदरी धरणातील पाणीसाठा कमी केला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.७ जानेवारी रोजी या प्रकल्पामध्ये ९९.५४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. ९३४ दलघमी क्षमता असलेल्या या प्रकल्पात ८०५.५४ दलघमी पाणीसाठा झाला होता. मात्र २३ फेब्रुवारी रोजी या प्रकल्पात ७०७.०९ दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी ८७.४० टक्के एवढी आहे. दीड महिन्यातच या प्रकल्पातील ९८ दलघमी पाणी सिद्धेश्वर मार्गाने उचलण्यात आले. याच गतीने पाणी नेल्यास भविष्यात परभणी जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ शकते.‘निम्न दुधना’त १०.५० टक्के पाणी४जिल्ह्यामध्ये मागील वर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे येलदरीसह करपरा, मासोळी या मध्यम प्रकल्पाबरोबरच गोदावरी नदीवरील बंधाºयातही समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. तर निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठा मात्र चिंतेचा विषय बनला आहे. या प्रकल्पात सद्यस्थितीला २५.४४ दलघमी जीवंत पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी १०.५० टक्के एवढी आहे. त्यामुळे सेलू तालुक्यासह परिसरातील गावांनाही टंचाईच्या झळा जाणवण्याची शक्यता आहे.
परभणी : १३ टक्क्यांनी घटला येलदरीचा पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 1:05 AM