प्रशांत मुळी ।लोकमत न्यूज नेटवर्कयेलदरी : अर्ध्या मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या येलदरी धरणाच्या मुख्य मातीच्या भिंतीवर मोठ मोठे झाडे उगवली आहे़ त्याचबरोबरच धरणाची माती ढासळू नये म्हणून लावण्यात आलेले दगडही गेल्या काही दिवसांपासून ढासळत आहेत़ त्यामुळे भविष्यात हे धरण शंभर टक्के भरले तर मातीच्या भिंतीला धोका निर्माण होऊ शकतो़मराठवाड्यात पहिल्या पंचवार्षिक योजनेत परभणी जिल्ह्यातील येलदरी येथे १९५८ साली पूर्णा नदीवर मोठे धरण बांधण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी घेतला़ जवळ जवळ २४ गावांतील ७ हजार ३०० हेक्टर शेत जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली़ दहा वर्षाच्या अथक् प्रयत्नानंतर १९६८ साली हा प्रकल्प बांधून तयार झाला़ आज या प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झालेली आहेत़ सुरुवातीच्या काळात या प्रकल्पाची देखभाल चांगली झाली़ मात्र मागील ५ -६ वर्षांपासून या प्रकल्पाला पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध नाही़ विशेष म्हणजे, नियमित कर्मचारी देखील या ठिकाणी हजर राहत नाहीत़ एकेकाळी १०० हून अधिक अधिकाऱ्यांचा राबता असणाºया येलदरी धरणावर आता बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी उपस्थित आहेत़ ते देखील सर्व मजूर संवर्गातील आहेत़ त्यामुळे धरणावर कोणतेही तांत्रिक काम निघाले तर एकही तांत्रिक कर्मचारी उपलब्ध होत नाही़ धरणाचे कोणतीही वार्षिक दुरुस्ती व देखभालीची कामे केली जात नाहीत़ त्यामुळे या धरणाचे मोठे नुकसान होत आहे. मशिनरींचे अनेक भाग ग्रिसींग, आॅईलअभावी गंजत आहेत़ एक वर्षापूर्वी येथील धरणाच्या सर्व्हींग गेटच्या मोटारीवरील लोखंडी झाकन वादळी वाºयाने उडून गेले होते. ते झाकन देखील अद्यापही प्रशासनाने बसविलेले नाही़मातीच्या भिंतीकडे : प्रशासनाचे दुर्लक्ष४येलदरी धरणाला एकूण ५ भिंती असून, त्यापैकी एक मुख्य दगडी भिंत आहे़ बाकीच्या चार मातीच्या भिंती आहेत़ यातील मातीच्या भिंतीकडे जलसंपदा विभागाने पूर्णत: दुर्लक्ष केले आहे़ या भिंतीवर लावलेले संरक्षक दगड ढाळसले असून, भिंतीवर झाडे उगवली आहेत़ परिणामी भविष्यात धरण पूर्ण क्षमतेने भरले तर या मातीच्या भिंतीला कधीही तडा जावू शकतो़ जलसंपदा विभागाने याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे़
परभणी:येलदरी धरणाचे दगड ढासळू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:47 AM