परभणी : केंद्र शासनाच्या विरोधात युवक काँग्रेसचे निषेधासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:36 AM2018-11-01T00:36:16+5:302018-11-01T00:37:06+5:30
सत्ता स्थापन करुन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने बुधवारी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगासने घालून शासनाच्या धोरणाच्या विरोधात अनोखे निषेधासन आंदोलन केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सत्ता स्थापन करुन चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतरही भाजप सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याने बुधवारी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर योगासने घालून शासनाच्या धोरणाच्या विरोधात अनोखे निषेधासन आंदोलन केले़
भाजपाने निवडणुकीपूर्वी जनतेला विविध आश्वासने दिली. केंद्रात सरकार स्थापन होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला तरीही आश्वासने पूर्ण केली नसून, सर्वसामान्य नागरिकांची शासनाने फसवणूक केल्याचा आरोप करीत युवक काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी बुधवारी हे आंदोलन केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्ते सकाळी १० वाजेच्या सुमारास एकत्र आले.
यावेळी वेगवेगळे आसने करुन कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाचा निषेध नोंदविला. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाने येणाºया-जाणाºयांचे लक्ष वेधले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, मुस्लिम आरक्षण, शेतकरी कर्जमाफी या प्रश्नांवर शासन अभ्यास सुरू आहे़, असे एकच उत्तर देत असल्याने या विरूद्ध अभ्यासन घालून निषेध नोंदविण्यात आला़ फसवी कर्जमाफी, हमीभाव या घोषणा केवळ घोषणाच राहिल्याने घोषणासन व गाजरासन करण्यात आले़
शासनातील लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय शेतकरी, सैनिकांच्या पत्नींविषयी अनुद्गार काढत असल्याने वाचाळासन करून निषेध नोंदविण्यात आला़ तसेच भक्तासन, धमक्यासन, राफेलासन आदी उपरोधिक आसने यावेळी करण्यात आली़
या आंदोलनात महाराष्ट्र युवक काँग्रसचे उपाध्यक्ष नागसेन भेरजे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रणित खजे, प्रक्षित सवणेकर, उपाध्यक्ष वसिम कबाडी, मोहसीन कबाडी, शेख दिलावर, अजहर लाला हाश्मी, इरफान जमीनदार, हनुमान देशमुख, दिगंबर खरवडे, श्रीराम जाधव यांच्यासह जिल्हाभरातील कार्यकर्ते सहभागी झाले होते.