लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी समग्र शिक्षा अभियानच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार निधी मंजूर करण्यात आला आहे़ जिल्हाभरातील १ हजार ९१ शाळांना ३ कोटी २८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी या माध्यमातून उपलब्ध झाला आहे़ त्यामुळे या शाळांमध्ये आता भौतिक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण घेतात़ या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे याबरोबरच शाळास्तरावर आवश्यक असलेल्या भौतिक सुविधा उपलब्ध असाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून सातत्याने प्रयत्न केले जातात़ शाळेची रंगरंगोटी, विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था, शैक्षणिक साहित्याची खरेदी, स्वच्छतागृह, वीज बिल या सारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी शाळास्तरावर पैशांची आवश्यकता असते़ अनेक शाळांनी लोकसहभागातून काही सुविधा उपलब्ध केल्या असल्या तरी जिल्हा परिषद प्रशासनानेही त्यासाठी निधीची तरतूद केली आहे़ त्यातूनच समग्र शिक्षा अभियानच्या माध्यमातून जिल्ह्यातील १ हजार ९२ शाळांना ३ कोटी २८ लाख ४५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करण्याची तरतूद करण्यात आली आहे़ त्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील १४५ शाळांसाठी ३९ लाख ६० हजार, जिंतूर तालुक्यातील २१० शाळांसाठी ५८ लाख ९० हजार, मानवत तालुक्यातील ६८ शाळांसाठी २५ लाख १० हजार, पालम १०१ शाळांसाठी २४ लाख ५० हजार, परभणी १५६ शाळांसाठी ५५ लाख, पाथरी ९८ शाळासांठी ३३ लाख २० हजार, पूर्णा १०७ शाळांसाठी ३४ लाख २५ हजार, सेलू १०८ शाळांसाठी ३२ लाख ४५ हजार रुपये, सोनपेठ ८५ शाळांसाठी २२ लाख ५० हजार आणि परभणी शहरातील १४ शाळांसाठी २ लाख ९५ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे़ परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागातील शाळांची दुरवस्था झाली आहे. अनेक शाळांची रंगरंगोटीही झाली नाही. शाळा दर्शनी भागात नीटनेटक्या असतील तर विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना उत्साह वाढतो. त्यामुळे शाळांची रंगरंगोटी करणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांची रंगरंगोटी करावी तसेच शाळा परिसरातील वातावरण प्रसन्न राहिल, या दृष्टीने प्रयत्न करावेत, अशा सूचना शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांनी दिल्या आहेत. दरम्यान, शाळास्तरावर हा निधी प्राप्त झाल्याने लवकरच जि़प़ शाळांमध्येही आवश्यक त्या भौतिक सुविधाही उपलब्ध होतील, अशी आशा निर्माण झाली आहे़... तर प्रशासकीय कारवाई होईल४शाळांमधील सुविधांच्या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून, अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहाचा वापर होत नसल्याचे निदर्शनास आले आहे़ ही बाब अत्यंत गंभीर आहे़४स्वच्छतागृहाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी शालेय व्यवस्थापन समितीची आहे़ विविध योजनांमधून स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली आहे़ देखभाल दुरुस्तीअभावी विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह उपलब्ध होत नाही़४तेव्हा उपलब्ध निधी स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्यासाठी प्राधान्याने खर्च करावा़ असे न झाल्यास शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव या नात्याने मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी दिले आहेत़विद्याार्थी संख्येनुसार निधीसमग्र शिक्षा अभियानच्या माध्यमातून शाळांना निधी देताना पटसंख्या ग्राह्य धरण्यात आली आहे़ त्यानुसार ० ते ३० पटसंख्या असलेल्या शाळांना प्रतिशाळा ५ हजार रुपये या प्रमाणे २२६ शाळांना ११ लाख ३० हजार रुपये, ३१ ते ६० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेला प्रतिशाळा १० हजार रुपये या प्रमाणे २२९ शाळांना २२ लाख ९० हजार रुपये, ६१ ते १०० विद्यार्थी संख्या असलेल्या १८० शाळांना प्रतिशाळा २५ हजार रुपये या प्रमाणे ४५ लाख रुपये, १०१ ते २५० विद्यार्थी संख्या असलेल्या ३७४ शाळांना १ कोटी ८७ लाख रुपये आणि २५१ ते १००० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना प्रतीशाळा ७५ हजार रुपये या प्रमाणे ८३ शाळांना ६२ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़
परभणी : सव्वातीन कोटींचा निधी जि़प़ शाळांना प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 12:27 AM