लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जागतिक कर्करोग दिनाच्या पार्श्वभूमीवर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी करण्याचा उपक्रम शिक्षण विभागाने राबविला असून, त्या दृष्टीने सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत़४ फेब्रुवारी रोजी जिल्हाभरात जागतिक कर्करोग दिन साजरा केला जात आहे़ तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारी आरोग्याची हानी या विषयी भावी नागरिक असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, तंबाखू सेवनाचे परिणाम, त्यापासून होणारे आजार आणि आरोग्याचे होणारे नुकसान या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना समाजावी, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे़त्यावरून या विभागाच्या कक्ष अधिकारी नेहा हुमरसकर यांनी शिक्षण विभागाला पत्र पाठवून तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी करण्याच्या सूचना दिल्या आहेत़ सलाम मुंबई फाऊंडेशन या संस्थेला राज्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये कर्करोग दिनाचे औचित्य साधून व्यसनमुक्तीसाठी तंबाखूची प्रतिकात्मक होळी हा उपक्रम पार पाडावयाचा आहे़तेव्हा सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन करावे, अशा सूचना या पत्रात दिल्या आहेत़ त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ़ सुचिता पाटेकर यांनी सर्व शाळांना पत्र पाठविले असून, त्यात ४ फेब्रुवारी रोजी जि़प़ शाळांमधील तंबाखूची प्रतिकात्मक होळी हा उपक्रम राबवित आहोत़ नव्या पिढीवर व्यसनमुक्तीचे संस्कार जडावेत, या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन केले आहे़या उपक्रमामुळे जे विद्यार्थी आपल्या परिजनांना व्यसनमुक्त करतील, त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना व्यसनमुक्तीसाठी २ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्र भूषण आणि महाराष्ट्ररत्न सन्मान देऊन गौरविले जाणार आहे़ तेव्हा जिल्ह्यातील सर्व शाळांनी उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ़ सुचिता पाटेकर यांनी केले आहे़जि़प़ शाळांनी सुरू केली उपक्रमाची तयारी४परभणी जिल्ह्यात १ हजारांपेक्षा अधिक जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत़ या शाळांमध्ये सलाम इंडिया संस्थेच्या वतीने तंबाखूची प्रतिकात्मक होळी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ शाळांमधूनही उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असून, या उपक्रमाची तयारी सुरू करण्यात आली आहे़ या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचे धडे दिले जाणार आहेत़ या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यसनापासून होणारे दुष्परिणाम याची माहिती मिळणार आहे़ शिवाय या विद्यार्थ्यांच्या परिसरातील इतर नातेवाईक व नागरिकांना व्यसनमुक्तीपासून दूर ठेवण्यासाठी हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे़
परभणी : जि़प़ शाळांत तंबाखूची प्रतिकात्मक होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 12:15 AM