लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करावी, या मागणीसाठी जिंतूर तालुक्यातील लिंबाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांच्या दालनात शाळा भरवून लक्ष वेधून घेतले.राज्य व केंद्र शासन जिल्हा परिषद शाळांचा कायापालट व्हावा, यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातूनच जिल्ह्यातील तीन ते चार शाळा आंतराष्ट्रीय शाळा म्हणून नावालारुपाला आल्या आहेत. तर बहुतांश शाळांचे डिजीटायलाझेशन झालेले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेचा गुणवत्ता व दर्जेदार शिक्षण देण्याचा स्तर उंचावत आहे.तर दुसरीकडे जिंतूर तालुक्यातील लिंबाळा येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यतच्या वर्गामध्ये ७३ विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेत शिक्षकांची पाच पदे मंजूर आहेत; परंतु, केवळ दोनच शिक्षक कार्यरत आहेत. यामध्ये प्राथमिक पदवीधर शिक्षकांची दोन पदे व मुख्याध्यापकाचे एक पद रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षकांची रिक्त पदे भरावीत, या मागणीसाठी ग्रामस्थांनी अनेक वेळा शिक्षण विभागाला निवेदने देऊन साकडे घातले; परंतु, शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे लिंबाळा ग्रामस्थांनी २५ जून रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास सीईओंचे दालन गाठले. त्यानंतर या दालनातच विद्यार्थ्यांची शाळा भरविली. दोन तासानंतर जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी ग्रामस्थांना दोन दिवसांत प्रतिनियुक्तीवर एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी सीईओंच्या दालनातील आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात रंगनाथ जवळे, ज्ञानेश्वर शिंदे, संतोष दराडे, दत्तराव काळे, वैजनाथ शिंदे, कांतराव घुगे, गणेश खंदारे, संजय जवळे, दिनकर दराडे, सुधीर घुगे, कैलास दराडे, विष्णू सुतळे, प्रकाश दराडे, भगवान घुगे, शंकर घुगे, दामोधर दराडे, सखाराम दराडे, सरपंच प्रकाश दराडे यांच्यासह विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
परभणी: जि.प. सीईओंच्या दालनात भरविली विद्यार्थ्यांनी शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:40 AM