लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीचे काम १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण झाले नसले तरी या अंतर्गत करण्यात येणाºया ७१ कामांसाठी १७ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीची सार्वजनिक बांधकाम विभागाने तरतूद केली असून, यातील बहुतांश कामांच्या निविदांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही़ तरीही रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे या विभागाकडून सांगण्यात येत आहे़सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा दीड महिन्यांपूर्वी केली होती़ त्यानंतर त्यांनी गेल्या महिन्यात जिल्हा दौºयावर येऊन याबाबतचा आढावा घेतला होता़ त्यावेळीही त्यांनी १५ डिसेंबरची डेडलाईन पाळली जाईल, असा आत्मविश्वास दाखविला होता़ परंतु, जिल्ह्यात १५ डिसेंबरपर्यंत रस्त्यांवरील खड्डेमुक्ती तर झालीच नाही़, ज्या खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी निविदा काढावयाच्या होत्या़ त्या निविदांची प्रक्रियाही पूर्ण झाली नसल्याची परिस्थिती समोर आली आहे़ विशेष म्हणजे काही ठिकाणी निविदा मंजूर होण्यापूर्वीच खड्डे दुरुस्तीची कामे सुरू असल्याचा दिखावा या विभागाकडून केला जात आहे़सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी ७१ कामांच्या निविदा काढल्या़ त्यासाठी १७ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे़ त्यामध्ये जिल्हा मार्गांतर्गत ३० कामांची निवड करण्यात आली़यासाठी ९ कोटी २ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली़ त्यापैकी ५ कोटी रुपयांच्या ९ कामांच्या निविदा काढून त्या मंजूर झाल्या व त्या अंतर्गत संबंधित कंत्राटदाराने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे़ ३ कोटी ६२ लाख ११ हजार रुपये खर्च करून होणाºया १३ कामांच्या निविदांची प्रक्रिया सुरू आहे़ ५७ लाख ९४ हजार रुपये खर्च करून तयार करण्यात येणाºया चार रस्त्यांच्या कामांच्या निविदांना पहिल्यांदा प्रतिसाद मिळाला नसल्याने त्या दुसºयांदा काढण्यात आल्या आहेत़ उर्वरित ४ कामांच्या निविदांची प्रक्रियाही सुरू आहे़ याशिवाय राज्य मार्गा अंतर्गत असलेल्या ४१ रस्त्यांच्या कामांसाठी ७ कोटी ९४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे़ या संदर्भातील निविदांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही़; परंतु, १५ डिसेंबरची डेडलाईन पाळायची असल्याने संबंधित कंत्राटदारांना खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने हिरवी झेंडी दाखविली आहे़ त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे़ परंतु, या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून, बुजविलेले खड्डे आठ दिवसांतच उघडे पडत असल्याची स्थिती पहावयास मिळत आहे़या संदर्भातील वृत्त शनिवारीच ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले आहे़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची घोषणा फसवीच ठरली आहे़परभणीत : सुरू केले रस्त्याचे कामरस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंतची डेडलाईन सा़बां़ विभागातील अधिकाºयांना दिली होती़ या पार्श्वभूमीवर रस्ते खड्डेमुक्त झाले का? याची पाहणी करीत ‘लोकमत’ने १६ डिसेंबर रोजीच्या अंकात विशेष पान प्रकाशित करून जिल्ह्यातील राज्य रस्ते, जिल्हा रस्ते आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था उघडी पाडली होती़ या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने शनिवारी सकाळपासूनच कामाला प्रारंभ केला़ जिल्हाभरातील रस्ते खड्डेमय असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर किमान शहरातील रस्त्यांची कामे या विभागाने सुरू केली़ डेडलाईन संपल्यानंतर का होईना या विभागाला ‘लोकमत’च्या वृत्ताने जाग आली आहे़
परभणीत खड्डेमुक्त रस्ते अभियान : ७१ कामांसाठी १७ कोटींचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:18 AM