लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कोतवालांचा चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी तालुक्यातील कोतवालांनी ७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.जिल्ह्यात सुमारे चारशे कोतवाल असून, या कोतवालांना मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्यात आली आहे. कोतवालांचा चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून नाशिक येथे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. याच धर्तीवर परभणी तालुक्यातील कोतवालांनी १ डिसेंबरपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे; परंतु, याकडे प्रशासन व राज्य शासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे शुक्रवारी परभणी तालुक्यातील कोतवालांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले.या आंदोलनात ज्ञानेश्वर बुलबुले, माणिकराव गिरी, रामेश्वर कनले, हनुमान राऊत, दत्ता पांचाळ, रामजी रिसेवाड, दत्तोपंत वाघमारे, रामा कोंडरे, गणेश आणेराव, प्रियेश हिंगे, आकाश मोरे, गिरीष देशमुख, अनंता दळवे, गजानन कावळे, मुंजा जुंबडे, भास्कर भुसे, संदीप नाईक, रामप्रसाद सानप, परमेश्वर रसाळ, संजय शिंदे, गजानन काळे, साहेबराव धोत्रे, सविता कोरडे, ज्योती तळेकर, छाया भूतकर, राजश्री निकरट, रुपाली उबाळे, विजयमाला जाधव, हेमलता गोंधळकर, सविता जाधव, प्रणिता बनकर, छगू साळवे, कैलास काळे आदींनी सहभाग नोंदविला.दहा कामांवर झाला परिणाम४कोतवालांचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरपासून नाशिक जिल्ह्यातील कोतवालांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास पाठिंबा म्हणून परभणी तालुक्यातील कोतवाल कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे शासकीय टपाल वाटप करणे, कार्यालयीन संगणीकृत कामे, आवक-जावक विभाग, निवडणूक संदर्भातील कामे, अभिलेख विभाग व इतर कार्यालयीन कामावर परिणाम झाला आहे. कोतवालांच्या चतुर्थश्रेणी कर्मचारी समावेश मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचे पत्र परभणी तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातील कामे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.
परभणीत कोतवालांचे कामबंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:40 AM