परभणी : आज परभणीकरांची पहाट आगीच्या वार्ताने उजाडली. पहाटे ३.३० वाजता साखला प्लॉट भागात एका घराला आग लागल्याची माहिती मनपा अग्निशमन विभागाला पोलीस नियंत्रण रूमवरून मिळाली. यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आग आजूबाजूच्या घरांपर्यंत पसरली होती. मोठ्या प्रयत्नाने अग्निशमन दलाने आगीवर तात्काळ नियंत्रण आणल्यामुळे अनर्थ टळला.
प्राथमिक माहितीनुसार, सदरील घटनेमध्ये ज्या घराला आग लागली होती ते पत्राचे होते. त्यामुळे आग पसरत जाऊन शेजारील घरांपर्यंत गेली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण करत शेजारील चार घरांनाही कवेत घेतले.त्यामुळें एकूण पाच घरांची अक्षरक्ष: राख झाली. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून पाचही कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी मनपाचे अग्निशमन अधिकारी डी.बी. कानोडे, फायरमन उमेश कदम, अक्षय पांढरे, वाहन चालक वशीम अखिल, अहेमद संतोष मुदिरज यांनी प्रयत्न केले.