परभणी- कडव्या शिवसैनिकांमुळेच परभणी लोकसभा मतदार संघाचा शिवसेनेचा बालेकिल्ला ३० वर्षानंतरही अभेद्य राहिला असून, शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवित पक्षातील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे़
१९९१ पासून परभणी लोकसभा मतदार संघात शिवसेनेने सुरू केलेली विजयी घोडदौड २०१९ च्या निवडणुकीतही कायम दिसून आली़ शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी एकाकी प्रचार यंत्रणा राबविली़ प्रचाराचे सुक्ष्म नियोजन, मतदारांशी थेट संपर्क, कार्यकर्त्यांची तगडी फळी आणि दांडगा जनसंपर्क या सर्व बाबींमुळे खा़ जाधव यांना या निवडणुकीत विजय मिळविता आला
राष्ट्रवादी काँग्रेसकडे सहा आमदार, सहा माजी आमदार, एक माजी खासदार याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तगडे मनुष्यबळ असतानाही खा़ जाधव यांनी कार्यकर्त्यांमध्ये मिसळून एकाकी दिलेली लढत त्यांच्या विजयाचे खास वैशिष्टये ठरले आहे़ विरोधी पक्षाकडे नेत्यांची फौज असून, कार्यकर्ता विरूद्ध नेता अशी ही निवडणूक होत असल्याचे जाधव यांचे म्हणणे होते़ प्रत्यक्षात मतदानानंतरही असेच काहीसे चित्र समोर आले आहेयुतीच्या काही नेत्यांनी पक्षधर्म बाजुला ठेवून काम केले असले तरी खा़ जाधव यांनी कार्यकर्त्यांच्या बळावरच मिळविलेले यश त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मानाचा तुरा रोवणारे आहे़ दोन वेळा आमदार व एक वेळा खासदार म्हणून मिळालेल्या अनुभवाचा पुरेपूर वापर त्यांनी या निवडणुकीत केला़ त्यामुळेच त्यांचा विजय सुकर झाला़