परभणी- शालेय पोषण आहाराचे मानधन देण्यास अधिकार्यांकडून टाळाटाळ होत असल्याने संतप्त कामगारांनी आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड केली.
जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार पुरविण्यासाठी शासनामार्फत शालेय पोषण आहार योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत सकस आहार तयार करण्यासाठी नेमलेल्या कामकागारांचे मानधन रखडले आहे. जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कामगार शालेय पोषण आहार बनविण्याचे काम करतात. या कामगारांना प्रति महिना एक हजार रुपये या प्रमाणे मानधन दिल्या जाते. २०१६ पासून काही कामगारांचे मानधन थकले आहे. त्यामुळे या कामगारांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मानधनासंदर्भात बैठकाही झाल्या. परंतु, प्रश्न सुटला नाही.
१५ जानेवारी रोजी मानधनाच्याच प्रश्नावर कॉ.किर्तीकुमार बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली कामगार शिक्षणाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी शिक्षणाधिकारी आशा गरुड कार्यालयात उपस्थित नव्हत्या. इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. परंतु, आजही या प्रश्नावर तोडगा निघणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या कामगारांनी कार्यालयातील खुर्च्यांची मोडतोड करुन काचा फोडल्या. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली. १५ ते २० मिनिटानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या कर्मचार्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.