लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : कर्जाच्या मागणीसाठी बँकेसमोर उपोषण करणारे शेतकरी तुकाराम वैजनाथ काळे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून घरचा कुटुंबप्रमुखच गमावल्याने मुलांच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या पत्नीच्या दवाखान्याचा प्रश्न कायम राहिल्याची बाब सदर प्रतिनिधीने शुक्रवारी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत समोर आली आहे.पाथरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्ज वाटपाच्या मागणीसाठी भारतीय स्टेट बँकेसमोर १२ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. १३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास या उपोषणार्र्थींमधील शेतकरी तुकाराम वैजनाथ काळे (३५) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. या घटनेमुळे बँकांची शेतकºयांप्रती असलेली अनास्था चव्हाट्यावर आली आहे. बँकेच्या धोरणाबद्दल शेतकºयांमध्ये कमालीचा संताप दिसून येत आहे. या अनुषंगाने गुरुवारी मयत शेतकरी तुकाराम वैजनाथ काळे यांच्या गोदावरी काठावरील मरडसगाव या गावाला भेट दिली. यावेळी या शेतकºयाची भयान परिस्थिती समोर आली. जवळपास अडीच हजार लोकसंख्येच्या या गावातील शेतकºयांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून गेल्या तीन-चार वर्षापासून समाधानकारक पाऊस होत नसल्याने येथील शेतकºयांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे. शासनाच्या कर्जमाफीचा लाभही अनेक शेतकºयांना झाला नाही. गावातील पाच ते सहा शेतकरी सप्टेंबर महिन्यापासून पाथरी येथील भारतीय स्टेट बँकेकडे कर्जाची मागणी करीत होते. त्यातील तुकाराम काळे यांच्या नावावर ४२ आर शेतजमीन आहे. त्यांची पत्नी सतत आजारी असते. त्यांना कानाचा त्रास असल्याने त्यांच्या उपचारासाठी तुकाराम काळे यांनी खाजगी व्यक्तींकडून ३ लाख रुपये हात उसणे घेतले होते. त्यानंतर त्यांनी पत्नीच्या दोन्ही कानावर शस्त्रक्रिया केल्या. त्यातून त्या अद्यापही बºया झाल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या आजाराचा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे शस्त्रक्रियेसाठी खाजगी व्यक्तींकडून घेतलेल्या ३ लाख रुपयांच्या मागणीचा तगादा त्यांच्याकडे होता. गाव शेजारील जनावराच्या गोठ्यालगत तुराट्याचे कुड करुन त्यावर पत्रे टाकून राहणाºया तुकाराम यांची एक मुलगी ८ वीत तर एक मुलगा चौथ्या वर्गात गावातील शाळेत शिकतो. त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाचा बोजाही त्यांच्यावर होता. शेतातील ३८ गुंठ्यामध्ये त्यांनी सोयाबीन पेरले. मात्र पावसामुळे मनावे तसे सोयाबीन निघाले नाही. भारतीय स्टेट बँकेकडून त्यांनी ४८ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्याचा सातबारावर बोजा होता. कर्जमाफीत त्यांचे नाव आले होत; परंतु, त्याचा लाभ त्यांना मिळाला नाही. त्यामुळे सप्टेंबरपासून ते बँकेकडे कर्ज मागत होते; परंतु, बँकेचे अधिकारी त्यांना दाद देत नव्हते. कर्जासाठी त्यांची बँकेत ये-जा सुरु होती. त्यातूनच त्यांनी कंटाळून इतर शेतकºयांसोबत बँकेसमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाला तशी माहिती दिली व ते १२ डिसेंबर रोजी उपोषणाला बसले आणि कर्ज फेडीची चिंता, पत्नीचा आजार, मुलांचे शिक्षण आदी चिंतेतून ते मानसिक दबावात आले.यातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. कर्त्या पुरुषाच्याच निधनामुळे काळे कुटुंबियांवर मोठे संकट कोसळल्याचे शुक्रवारी केलेल्या पाहणीत समोर आले. दरवर्षी ते मुलांना भावाच्या घरी सोडून ऊस तोडणीसाठी पत्नीला सोबत घेऊन जात असत; परंतु, गेल्या दोन वर्षांपासून पत्नी आजारी असल्याने ते ऊस तोडणीसाठी जात नव्हते. त्यामुळेच त्यांना कर्जाची आवश्यकता होती. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना बँकेच्या अधिकाºयांच्या मनातील संवेदना जाग्या झाल्या नाहीत.दोन्ही बँका दिवसभर बंद४मरडसगाव येथील शेतकरी तुकाराम काळे यांचे गुरुवारी निधन झाल्यानंतर शेतकºयांनी कारवाईच्या मागणीसाठी बँकेसमोर मृतदेह आणून ठेवला होता. या प्रकरणी गुरुवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास बँकेकडून काळे कुटुंबियांना १० लाखांची आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन क्षत्रीय व्यवस्थापक विश्वासराव यांनी दिले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रस्ताव दाखल करुन तो मंजूर करुन घेऊ, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी व्ही.एल. कोळी यांनी दिले. त्यानंतर शेतकºयांनी आंदोलन मागे घेतले व बँकेसमोरुन मृतदेह हलविण्यात आला. या घटनेनंतर शुक्रवारी पाथरी येथील भारतीय स्टेट बँकेच्या दोन्ही शाखा कुलूपबंद होत्या.४तुकाराम काळे यांच्या पार्थिवावर १४ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी एकही मोठा अधिकारी फिरकला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमधून संतापाची भावना पहावयास मिळत होती. प्रशासन जनतेप्रती संवेदनशील होत नसेल तर ही व्यवस्था काय कामाची आहे, असा सवाल यावेळी उपस्थित शेतकºयांनी केला.पाथरीत कडकडीत बंद४मरडसगाव येथील शेतकरी तुकाराम काळे यांचा बँकेच्या गलथान कारभारामुळे नाहक बळी गेला. त्यामुळे बँकेच्या अधिकारी व कर्मचाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शुक्रवारी पाथरीत बंद पुकारण्यात आला होता. सकाळी १० वाजता सर्वच पक्षाचे पदाधिकारी व शेतकºयांनी शहरातून बंदचे आवाहन केले. त्यानंतर सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद झाली. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी तहसीलदार निलम बाफना यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.शनिवारी मानवत बंद४शेतकरी तुकाराम काळे मृत्यू प्रकरणी संबंधित अधिकाºयांवर कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १५ डिसेंबर रोजी मानवत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. काळे यांच्या मुलांना परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील केंद्रीय विद्यालयात प्रवेश द्यावा, त्यांच्या कुटुंबाचे पूनर्वसन करावे, याही मागण्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष बालासाहेब आळणे, हनुमान मसलकर, अशोक बारहाते, कारभारी कदम आदींनी केले आहे.
परभणी ’ प्रमुखाच्या निधनाने कुटुंब आले उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:47 AM