परभणी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची राज्य कार्यकारिणी गुरुवारी जाहीर करण्यात आली असून, त्यात परभणीला झुकते माप देण्यात आले आहे. पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी परभणीतील बाळासाहेब देशमुख व माजी खा. ॲड. तुकाराम रेंगे यांची, तर सरचिटणीसपदी सिद्धार्थ हत्तीअंबिरे आणि हरिभाऊ शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीकोनातून काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीत जिल्ह्याला झुकते माप देण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी खा. ॲड. तुकाराम रेंगे यांची, तर सरचिटणीसपदी हरिभाऊ शेळके यांची नियुक्ती करण्यात आली होती. पक्षाच्या नूतन कार्यकारिणीत त्यांची नियुक्ती कायम ठेवण्यात आली असून, पक्षाचे माजी खा. दिवंगत राजीव सातव यांचे कट्टरसमर्थक बाळासाहेब देशमुख यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, तर सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता परभणी जिल्ह्यात काँग्रेसचे दोन प्रदेश उपाध्यक्ष व दोन प्रदेश सरचिटणीस झाले आहेत. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षीय बळ वाढविण्याची या प्रदेश कार्यकारिणी सदस्यांवर जबाबदारी आली आहे.