परभणी : आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत असल्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघत आहे. त्यातच परभणीची जागा कुणाची यावर आता मतभेद पुढे येत असल्याचे चित्र आहे. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर परभणीच्या जागेवर गेल्या काही दिवसांपासून भाजप दावा करत असून त्या अनुषंगाने रणनीतीसुद्धा आखत आहे; परंतु, ही जागा आमची आहे, त्यांचा संबंध काय, असा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेचे संपर्कप्रमुख अर्जुन खोतकर यांनी परभणीच्या जागेवर आपला दावा ठोकला आहे. शुक्रवारी परभणीत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आगामी २०२४ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष आपापल्यापरीने तयारी करत आहे. त्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप हे आगामी निवडणुकीला एकत्रित सामोरे जाणार असून त्या अनुषंगाने रणनीती आखत आहे. तर महाविकास आघाडीत आपापल्या स्तरावर जागांची चाचपणी करत असल्याची स्थिती आहे. शिवसेनेत दुफळी निर्माण झाल्यानंतर भाजपने परभणीच्या जागेवर दावा करत साधारण वर्षभरापासून केंद्र तसेच राज्यस्तरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून या जागेसंदर्भात रणनीती आखत आहे. त्या अनुषंगाने सातत्याने आढावा बैठका, विधानसभा मतदारसंघ तसेच मतदान केंद्रनिहाय नियोजन करण्यात येत आहे.
परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे संबंधित जागा आमच्या कोट्यातील असून आगामी काळात लाेकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचाच उमेदवार पुढे येईल, ही जागा आमची असून भाजपचा कुठलाही संबंध नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे संपर्कप्रमुख अर्जुन खोतकर यांनी शुक्रवारी केले. या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात पूर्वीपेक्षा अधिक जागा कशा जिंकता येतील, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंतप्रधान आम्हाला नाही, मोदींना व्हायचंयआगामी काळात पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून नरेंद्र मोदी पुढे येतील, त्यांच्यासाठी देशभरात एकत्रितपणे काम सुरू आहे. राज्यात भाजप- शिवसेना आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असून परभणीची जागा आम्हीच लढणार असल्याचे संपर्कप्रमुख अर्जुन खोतकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. लोकसभेसाठी परभणीत भाजप उमेदवार देणार असल्याचे त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यासह त्याअनुषंगाने पक्षपातळीवर तशी रणनीतीसुद्धा आखण्यात येत आहे; पण ते परभणीत आमच्यासाठी काम करत आहे, इतर ठिकाणी आम्ही त्यांच्यासाठी करतोय. कारण पंतप्रधान आम्हाला नाही तर नरेंद्र मोदींना व्हायचे आहे, त्या अनुषंगाने आमच्यासह तेसुद्धा लोकसभेसाठी काम करत असल्याचे खोतकर यांनी स्पष्ट केले.