परभणीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वाहूळ यांची पदोन्नतीने उपसंचालक म्हणून बदली झाली. १६ डिसेंबरला पदोन्नतीने झालेल्या बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यात पदोन्नती तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने निवड सूचीतील अधिकाऱ्यांना नियमित व सेवा ज्येष्ठतेचा कोणताही हक्क मिळणार नसल्याचे नमूद केले, तसेच आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत पदोन्नतीच्या पदावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वाहूळ परभणी येथून कार्यमुक्त झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांच्याकडे सोपविण्यात आला; मात्र जेमतेम २० ते २५ दिवसातच त्यांचा प्रभार काढून तो त्यांच्याच कार्यालयातील वर्ग-२ चे अधिकारी असलेले उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्याकडे सोपविण्यात आला. त्याबाबत १९ जानेवारीला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव दीपक शेलार यांनी आदेश निर्गमित केले आहे. भुसारे यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात हा प्रभार सोपविण्यात आल्याचेही आदेशात नमूद आहे.
राज्य शासनाने प्रभार सोपविण्यासंबंधी ५ सप्टेंबर २०१८ रोजी एक परिपत्रक निर्गमित केले. त्यात महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ व विविध शासन निर्णयानुसार प्रभार सोपविण्यासंबंधी तत्वे निश्चित केली. त्यात समकक्ष अधिकाऱ्याकडे प्रभार सोपविण्याचे निर्देश देण्यात आले. अनेकदा योग्य, सेवाज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींना अतिरिक्त कार्यभार देताना डावलले जाते व त्यामुळे प्रशासनास अपेक्षित लाभ मिळत नसल्याचेही नमूद आहे. त्यामुळेच शासनाने सदर परिपत्रकात दुसऱ्या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार एकाच प्रशासकीय विभागांतर्गत, प्रशासकीय सोय व निकड लक्षात घेऊन शक्यतो त्याच कार्यालयातील, त्याच संवर्गातील सर्वात सेवाज्येष्ठ, अनुभवी व कार्यक्षम अधिकाऱ्याकडे सोपविण्याचे निर्देश दिले आहे; मात्र परभणी येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार डॉ. पाटेकर यांच्याकडून काढून कनिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यामुळे शासन आदेशाचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. याबाबत शैक्षणिक वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जाते. वास्तविक माध्यमिक शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार प्राथमिक किंवा निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांना देणे आवश्यक होते. त्यानुसार तो प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यातही आला; मात्र अवघ्या काही दिवसातच त्यांचा प्रभार काढून कनिष्ठ अधिकाऱ्याला देण्यामागचा हेतू गुलदस्त्यात आहे.