परभणी : जिल्ह्यातील वक्फ मिळकतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथे कार्यरत असलेले जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय बंद करण्यात आले असून या कार्यालयाचा कारभार आता औरंगाबाद येथील प्रादेशिक कार्यालयातून चालणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वक्फ मिळकतीसंदर्भातील समस्या आणि तक्रारींसाठी आता नागरिकांना थेट औरंगाबाद गाठावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अंतर्गत परभणी येथे जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालय मागील अनेक वर्षांपासून कार्यरत होते. शहरातील जिल्हा न्यायालय परिसरातील एका इमारतीत या कार्यालयाचा कारभार चालत होता. परभणी जिल्ह्यातील वक्फ मिळकतींच्या नोंदी ठेवणे, या मिळकतींवर नियंत्रण ठेवणे यासह इतर अनेक कामे या कार्यालयातून केली जातात. जिल्हा वक्फ अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील वक्फ संस्थांचे वक्फ फंड जमा करुन घेणे, वक्फ मंडळाच्या अखत्यारितील मशिदींमधील पेश इमाम व मौजान यांचे पगार करणे, मशिदी आणि दर्गाची देखभाल करणे, त्यांची वीज बिले भरणे, विविध दर्गा, देवस्थानामध्ये संदल काढणे, ऊरुस भरविणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, विवाह विषयक नोंदीचे अद्ययावत दस्ताऐवज ठेवणे, जिल्ह्यातील वक्फ मिळकती संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करणे आदी कामे या कार्यालयाच्या माध्यमातून केली जात होती.
जिल्ह्याच्या ठिकाणी हे कार्यालय असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील वक्फ मिळकतींवर नियंत्रण ठेवणे शक्य होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाची बैठक होऊन त्यात हे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार परभणी येथील वक्फ कार्यालयातील सर्व दस्ताऐवज औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात हलविण्यात आले आहेत. त्याच प्रमाणे कर्मचारीही आता औरंगाबाद कार्यालयातूनच कामकाज पाहणार आहेत.
१ हजारापेक्षा अधिक मालमत्तामहाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अंतर्गत परभणी जिल्ह्यामध्ये सुमारे ११०० पेक्षा अधिक मालमत्ता आहेत. त्याच प्रमाणे वक्फ मंडळाची जिल्ह्यामध्ये साधारणत: ५ हजार एकर जमीन आहे. या मालमत्ता आणि जमिनीचे अद्ययावत दस्ताऐवज जिल्हा वक्फ अधिकारी यांच्याकडे असतात. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये असलेल्या या मालमत्तांवर अतिक्रमणे होत आहेत. अनेक मालमत्ता विषयी न्यायालयात वाद आहेत. काही मालमत्तांची विक्रीही झाल्याच्या तक्रारी आहेत. अशा परिस्थितीत या मालमत्तांवर नियंत्रण ठेवणे जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांना शक्य होते. मात्र हे कार्यालयच औरंगाबाद येथे हलविल्याने मालमत्तांवरील नियंत्रण सैल होऊन अतिक्रमणे वाढण्याची शक्यता आहे. तसेच न्यायालयीन प्रकरणातही दिरंगाई होऊ शकते.
निर्णय रद्द करण्याची मागणीपरभणी जिल्हा वक्फ अधिकाऱ्यांचे कार्यालय औरंगाबाद येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. हे कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी व्यवस्थित सुरु होते. या मंडळातील काही सदस्यांनी वक्फ मिळकती हस्तांतरण केल्याचा आरोप होत आहे. त्यातूनच ही अभिलेखे सर्वसामान्य नागरिकांना मिळू नयेत. नागरिकांनी त्याचा पाठपुरावा करु नये, या उद्देशानेच गैरकायदेशीर बैठक घेऊन कार्यालय स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप एमआयएमचे जिल्हाध्यक्ष अॅड.इम्तियाज खान यांनी केला आहे.