लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रविवारी जिल्ह्यात एप्रिल महिन्यातील विक्रमी तापमानाची नोंद झाली असून, जिल्ह्याचा पारा ४७़२ अंशावर पोहोचल्याने नागरिकांना दिवसभर कडक उन्हाचा सामना करावा लागला़जिल्ह्यात यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऊन तापत आहे़ तीन दिवसांचा अपवाद वगळता संपूर्ण एप्रिल महिन्यात ४० अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद जिल्ह्यात झाली़ त्यामुळे उन्हाचा त्रास जिल्हावासियांना सहन करावा लागत आहे़२८ एप्रिल रोजी भारतीय हवामानशास्त्र विभागाने जिल्ह्यात ४७़२ अंश कमाल तापमानाची नोंद घेतली असून, परभणी जिल्ह्याच्या इतिहासातील हे तापमान सर्वात उच्चांकी तापमान ठरले आहे तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने रविवारी ४५़५ अंश कमाल तापमानाची नोंद घेतली असून, या विभागाकडे असलेल्या ३० वर्षांच्या इतिहासातील एप्रिल महिन्यातील सर्वाधिक तापमान नोंद झाले आहे़ एकंदर जिल्ह्यात उन्हाचा पारा नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे़ रविवारी सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उष्मा होता़ प्रखर सूर्यकिरणांमुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले़ रविवार हा सुटीचा दिवस असून, त्यातच तापमानही मोठ्या प्रमाणात वाढल्याने दिवसभर शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट जाणवला़ येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विक्रमी तापमानाने परभणीकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 11:57 PM