लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील विविध भागात रविवारी दत्तजन्मोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.येथील दत्तधाम परिसरात दत्त जयंतीनिमित्त मागील एक महिन्यांपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. ३ डिसेंबर रोजी दत्त जयंतीचा मुख्य सोहळा घेण्यात आला. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने दत्तधाम परिसरात फुलांची आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तसेच दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दत्त जन्मोत्सवानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. लक्षदीपांनी दत्तधाम परिसर उजळून निघाला होता. परभणी शहरासह परिसरातील भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित होते.येथील कारेगावरोड भागातील दत्तनगरातही रविवारी दत्तजन्मोत्सव साजरा करण्यात आला. दत्त जयंतीनिमित्त भागवत कथेचे आयोजन केले होते. ह.भ.प. मुकूंद महाराज गोंदीकर यांनी कथा वाचन केले. रविवारी सायंकाळी ह.भ.प. शंकर महाराज काळे यांचे दत्त जन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ७ दिवसांपासून दत्तनगर येथे विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. सोमवारी महाप्रसादाने दत्त जयंती उत्सवाची सांगता होणार आहे.शहरातील विकासनगर येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक केंद्रातही रविवारी दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आला. या ठिकाणीही सात दिवसांपासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शिवाजीनगर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातही दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परभणीत दत्त जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:25 AM