लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात न मिळणाºया परभणी शहरात आता नागरिक वाढत्या धुळीच्या त्रासाने बेजार झाले आहेत़ शहरातील धुळी संदर्भात नागरिकांची मते जाणून घेतली तेव्हा इतर तालुक्यांच्या गावांच्या तुलनेत जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या परभणी शहरात धुळीचे प्रदूषण सर्वाधिक असल्याचे मत नागरिकांनी ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात व्यक्त केले आहे़शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पडले आहेत़ रस्त्याची नवीन कामे सुरू होत नाहीत़ जी कामे सुरू झाली, ती अनेक दिवस रखडत आहेत़ या सर्व बाबींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे़ सद्यस्थितीला वातावरणात मोठ्या प्रमाणात धुलीकण मिसळत असून, याचे प्रदूषण परभणीकरांच्या आरोग्यालाच घातक ठरू लागले आहे़ त्यामुळे शहरातील वाढत्या धुळीविषयी नागरिकांना काय वाटते? हे ‘लोकमत’ने सर्वेक्षणातून जाणून घेतले़परभणी शहरात धुळीचे प्रमाण कसे आहे? या प्रश्नावर ९४ टक्के नागरिकांनी सर्वाधिक असे उत्तर देऊन धुळीच्या प्रदूषणाचा वाढलेला विळखा निदर्शनास आणून दिला़ ६ टक्के नागरिकांना मात्र इतर शहरांच्या तुलनेत अधिक आहे, असे वाटते़शहरातील धुळीच्या प्रदूषणाला कोण जबाबदार? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ८४ टक्के नागरिकांनी महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरले़ १० टक्के नागरिकांनी केवळ सार्वजनिक बांधकाम विभागावर ठपका ठेवला़ तर ६ टक्के नागरिकांनी केवळ महानगरपालिका जबाबदार असल्याचे सांगितले़ वाढत्या धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे का? या प्रश्नावर ७० टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले आहे़ १८ टक्के नागरिकांनी नाही, असे म्हटले तर १२ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले़एकंदर शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे़ प्रत्येक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ झाल्याने नागरिक त्रस्त आहेत़ शहरातील सार्वजनिक रस्त्यांची नियमित सफाई होत नसल्यानेही धूळ वाढत आहे़ त्याचबरोबर शहरातील काही भागात रस्त्यांची कामे अर्धवट झाली आहेत़ रस्त्यावर खड्डे खोदून त्यातील माती रस्त्याच्या कडेला टाकण्यात आली़ वाहनांच्या वर्दळीमुळे ही माती हवेत मिसळून धुळीचा त्रास वाढत चालला आहे़ वाढत्या धुळीमुळे नागरिकांना घराबाहेर पडतानाच काळजी घ्यावी लागत आहे़ सोबत रुमाल, डोळ्यावर गॉगल घालूनच घराबाहेर पडावे लागत आहे़ मागील सहा महिन्यांपासून हा त्रास नागरिकांना अधिक सहन करावा लागत आहे़ त्यामुळे रस्ते, पाणी, वीज या मुलभूत सुविधा मिळविण्याबरोबरच आता धुळीच्या त्रासापासून सुटका करावी, अशी नागरिकांची मागणी आहे़ मात्र महापालिकेने अजूनही ठोस पावले उचलली नाहीत़
वाढत्या धुळीने परभणीकर झाले बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:45 AM