परभणी- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी स्वराजसिंह परिहार यांची फेरनिवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी संतोष बोबडे व जाकेर खान मोईन खान ऊर्फ जाकेरलाला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील निर्णय मंगळवारी मुंबईत पक्षाच्या वतीने घेण्यात आला.
परभणी महानगरपालिकेतील एका स्वीकृत सदस्य पदावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी व शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद निर्माण झाला होता. या वादात महानगरपालिकेतील १३ नगरसेवक परिहार यांच्या बाजुने गेले व त्यांनी आ.दुर्राणी यांचे समर्थक तथा मनपातील गटनेते जलालोद्दीन काजी यांचे गटनेतेपद काढून चॉंद सुभाना जाकेर खान यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्याला विभागीय आयुक्तांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर अॅड. परिहार यांना शहर जिल्हाध्यक्षपदावरुन काही दिवसांपूर्वीच पक्ष नेतृत्वाने दूर केले होते. त्यांच्या जागी २८ फेब्रुवारी रोजी संतोष बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे अॅड. परिहार यांच्या गटात असंतोष निर्माण झाला होता. या अनुषंगाने १३ नगरसेवकांनी परिहार यांना न्याय द्यावा, अन्यथा लोकसभा निवडणुकीत आपण अन्य पर्यायाचा विचार करु असा इशारा दिला होता. तसेच गत आठवड्यात राष्ट्रवादी अर्बन सेलच्या प्रमुख खा.वंदना चव्हाण, उपाध्यक्ष रमेश पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित कार्यशाळेलाही या नगरसेवकांनी दांडी मारली होती. ही बाब पक्ष नेतृत्वाला राज्यस्तरावर कळविण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील अंतर्गत वाद आणखी वाढू नये, या दृष्टीकोनातून पक्षाने अॅड.परिहार यांची शहर जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्याचा निर्णय सोमवारी घेतला होता. त्यानंतर या संदर्भातील अधिकृत घोषणा मंगळवारी करण्यात आली. त्यामध्ये परिहार यांच्या नियुक्ती बरोबर सध्याचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष बोबडे यांची शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच जाकेर खान मोईन खान ऊर्फ जाकेरलाला यांचीही शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील माहिती मिळताच परिहार यांचा परभणीत कार्यकर्त्यांनी सत्कार केला. दरम्यान, परिहार यांच्या फेरनिवडीनंतर राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद मिटल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरु आहे.