पूर्णा : महिलांनी एकत्र येऊन काम केले तर रोजगारनिर्मितीबरोबरच आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत उभे केले जाऊ शकतात. हे तालुक्यातील वाई येथील पंचशील स्वयंसहाय्यता बचत गटाने दाखवून दिले आहे. सध्या या गटाने पिठाची गिरणी, कांडप यंत्र तसेच ट्रॅक्टरच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती सुरू केली आहे.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्ह्यात बचत गटाची चळवळ राबविली जात आहे. याच चळवळीतून २०१३ मध्ये वाई येथे पंचशील स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना करण्यात आली. कष्ट करणाऱ्या महिलांना एकत्र करून रोजगार निर्माण करण्याचे ध्येय गटाच्या अध्यक्ष शालू अशोक कापुरे व सचिव मंगल अनिल कापुरे यांनी समोर ठेवले. बचत गटाची बांधणी करीत त्यादृष्टीने कामकाजही सुरु करण्यात आले. सुरुवातीला बचत गटाचे भांडवल आणि त्यावर मिळालेल्या एक लाख रुपयांच्या कर्जातून पिठाची गिरणी आणि अगरबत्ती निर्मितीचा व्यवसाय सुरू करण्यात आला. मार्केटिंगचा अनुभव नसल्याने या व्यवसायाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, पिठाच्या गिरणीतून मिळत गेलेल्या उत्पन्नावर बँकेचे कर्ज फेडण्यात आले. त्यानंतर हळूहळू गटाचे उत्पन्न वाढल्याने महिलांना अधिक ऊर्जा मिळाली. विविध मेळावे आणि शिबिरातून नवीन माहिती पुढे आली. त्यानंतर महाराष्ट्र बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेत शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यात आला. महिला आर्थिक विकास महामंडळाने केलेल्या मार्गदर्शनानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून सोडत पद्धतीने मिनी ट्रॅक्टरचा लाभ बचत गटाला मिळाला. एकामागे एक उद्योग सुरू करीत बचत गटाने उत्पन्न वाढविले आहे. या कामात बचत गटाच्या लक्ष्मी टोपाजी कापुरे, ललिता भास्कर कापुरे, ज्योती देवानंद कापुरे, मनीषा प्रमोद कापुरे, गयाबाई बाबाराव कापुरे, शकुंतला ग्यानोजी कापुरे, आशा विष्णू जोंधळे या सदस्यांनी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे आर्थिक स्थिती दिवसेंदिवस मजबूत होत असताना या गटाच्या माध्यमातून संघर्ष ग्राम विकास संस्था व मायक्रो लाईव्ह फायनान्सची निर्मिती करण्यात आली. भविष्यात मोठा प्रकल्प गटाच्या माध्यमातून राबविण्याचा मानस या महिलांनी व्यक्त केला आहे.
सामाजिक बांधिलकी जपली
रोजगारनिर्मितीबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याचे कामही बचत गटाने केले आहे. गावातील परसराम डाखोरे यांना उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. बचत गटाच्या सदस्यांनी पुढाकार घेत त्यांना आर्थिक मदत केली. यामुळे परसराम डाखोरे यांना पुनरूज्जीवन मिळाले. या कार्यातून आत्मिक समाधान मिळाल्याची भावना बचत गटाच्या सचिव मंगल कापुरे यांनी व्यक्त केली.