- विठ्ठल भिसे
पाथरी ( परभणी ): परभणीसह सेलू आणि जिंतूर येथे शासनाने हमी भाव खरेदी केंद्र सुरू केले असले तरी मानवत येथील हमी भाव केंद्र सुरू करण्यास विलंब लावला जात असल्याने व्यापारी याचा लाभ उठवित असून, हमीभावापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी होत आहे. त्यामुळे तुरीचे मोठे उत्पादन होऊनही शेतकर्यांना आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे.
पाथरी तालुक्यामध्ये यावर्षीच्या खरीप हंगामामध्ये ४ हजार २६० हेक्टवर तुरीचा पेरा करण्यात आला. सध्या तूर काढणी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक शेतकर्यांना ९ ते १० क्विंटल तुरीचा उतारा मिळत आहे. खरिपातील कापूस पीक बोंडअळीेने फस्त केल्याने तूर पिकावरच शेतकर्यांची मदार आहे. सध्या बाजारपेठेत तुरीची आवक सुरू असून शासनाने हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पाथरी आणि मानवत या दोन तालुक्यांसाठी गतवर्षीप्रमाणे एकत्र खरेदी केंद्र सुरू होणार आहे. परंतु, हे केंद्र सुरू झाले नाही.
गतवर्षी राज्य शासनाने तुरीला ५०५० रुपये हमीभाव दिला होता. यावर्षी मात्र ५ हजार २५० रुपये हमी दर व २०० रुपये बोनस असा ५ हजार ४५० रुपये दर जाहीर केला आहे. तसेच शासनाने प्रत्येक शेतकर्यांची ७.५० क्विंटल तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याने अडचण निर्माण झाली आहे. खरेदी केंद्र सुरू झाले नसल्याने तालुक्यातील तूर उत्पादक शेतकरी व्यापार्यांच्या दारामध्ये तूर आणत आहेत. व्यापार्यांकडून ४ हजार ते ४२०० रुपये प्रती क्विंटल एवढ्या कवडीमोल दराने तूर खरेदी केली जात आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी त्रस्त झाला आहे. पाथरी व मानवत तालुक्यासाठी मानवत येथे तूर खरेदी केंद्र सुरू होणार असल्याने खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी केली जात आहे. दोन्ही तालुक्यातील १४०० शेतकर्यांची नोंदणी झाली असून आणखी १२०० शेतकर्यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र खरेदी केंद्रच सुरू नसल्याने शेतकर्यांना कवडीमोल दराने तूर विक्री करावी लागत आहे.
केंद्र सुरू करण्यास जाणीवपूर्वक विलंबएक महिन्यापासून तूर बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहे. मात्र अद्याप मानवत येथील हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू झाले नाही. विदर्भ फेडरेशनच्या वतीने मानवत येथे तूर खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. अधिकाधिक शेतकर्यांची तूर खाजगी बाजारपेठेत विक्री व्हावी, जेणे करुन शिल्लक राहिलेलीच तूर हमी भाव केंद्रावरुन खरेदी होईल, या उद्देशाने हमी भाव केंद्र सुरू करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे, असा आरोप आता तूर उत्पादक शेतकरी करीत आहेत. शुक्रवारपासून जिल्ह्यात तीन खरेदी केंद्र सुरू झाले मात्र, यात मानवत खरेदी केंद्राचा समावेश नसल्याने शेतकर्यांचा रोष वाढला आहे
पाथरीत केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्तावपाथरी तालुक्यातील शेतकर्यांची गैरसोय लक्षात घेता पाथरी येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करावे, असा प्रस्ताव बाजार समितीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कार्यालयाकडे सादर केला आहे. यासाठी १ हजार मे.टन क्षमता असलेले गोदामही उपलब्ध करून दिल्याची माहिती बाजार समितीचे सचिव बापू कुटे यांंनी दिली आहे.
पाथरी बाजार समितीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात कळविले असले तरी पाथरी येथील खरेदी विक्री संघ अ वर्ग सभासद नाही. पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे पाथरी येथे खरेदी केंद्र सुरू होण्यास अडचणी असल्याची माहिती फेडरेशनच्या अधिकार्यांनी दिली.किमान मानवत येथील हमी भाव तूर केंद्र तातडीने सुरू करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनने प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकर्यांतून जोर धरत आहे.
शासनाकडून परवानगीचे प्रयत्न सुरु पाथरी येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी व्यापार्यांकडील दोन्ही गोदाम खाली करून घेतले आहेत. शासनाकडे तशी मागणी करण्यात आली आहे. शासनाकडून परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - अनिल नखाते, सभापती, बाजार समिती
अनेक अडचणी येत आहेत दोन्ही तालुक्यासाठी एकच खरेदी केंद्र मानवत येथे असल्याने नाव नोंदणीपासून अडचणी आहेत. तुरीच्या मापातही अडचणी वाढणार असून ही बाब शेतकर्यांसाठी बाधक आहे.- माणिक भिसे, व्यवस्थापक खरेदी विक्री संघ