परभणी :
पाथरीच्या साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुरीला मुहूर्त मिळत नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. मुंबईत २० सप्टेंबर रोजी मुख्य सचिवांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुधारित विकास आराखडा दुरुस्तीसह पुन्हा पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील समितीची मंजुरी घेऊन सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पाथरीचा साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा काही वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तीन वेळा सुधारित आराखडा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आला होता. युतीच्या काळात या आराखड्याला मान्यता मिळाली नाही. त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळातही मान्यता मिळू शकली नाही. पावसाळी अधिवेशनापूर्वी १८ ऑगस्ट रोजी उच्चाधिकार समितीची बैठक अचानक रद्द झाली होती. पुन्हा २० सप्टेंबर रोजी मुंबईत मुख्य सचिव यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस वित्त विभाग प्रधान सचिव राजगोपाल देवरा, अवर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, नगरविकासाच्या उपसचिव विद्या हम्पया, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पाथरीच्या मुख्याधिकारी कोमल सावरे, प्रशासकीय अधिकारी राघवेंद्र विश्वामित्रे यांची उपस्थिती होती.
या वेळी १६५ कोटींचा आराखडा सादर केला होता. उच्चाधिकार समितीने हा आराखडा पुन्हा सुधारित पाठवण्याच्या सूचना तर दिल्याच त्याचबरोबर सुरुवातीला मंदिर परिसर सुविधा आणि एक रस्ता काम, त्यानंतर इतर कामे प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच हा सुधारित आराखडा जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीची मंजुरी घेऊन शासनाकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याने आराखडा मंजुरीचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर पडला आहे.मुंबई येथे झालेल्या बैठकीत मंदिर परिसर कामे पहिल्या टप्प्यात समावेश करण्याबाबत आणि पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समितीमार्फत सुधारित आराखडा पुन्हा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- कोमल सावरे, मुख्याधिकारी, न. प. पाथरी