-विठ्ठल भिसेपाथरी (परभणी ): साईबाबा यांचे जन्मस्थळ पाथरी येथील 'साईबाबा तीर्थक्षेत्र' विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सप्टेंबर महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ९१ कोटी ८० लाख रुपये निधीस मान्यता दिली होती. आता शासनाकडून पहिल्या टप्प्यात ५० कोटी रुपयांचा विकास आराखडा निधी जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे वितरित करण्यात आला आहे. नियोजन विभागाचे उपसचिव मिलिंद कुलकर्णी यांनी १३ फेब्रुवारी रोजी हा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे आता विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
पाथरी ही साईबाबा यांची जन्मभूमी असून येथे साईबाबा यांचे भव्य मंदिर उभारणी करण्यात आली आहे. मात्र, साईबाबा तीर्थक्षेत्र विकास कामापासून आजपर्यंत वंचित राहिले. मंदिराकडे जाण्यास साधा रस्ताही नसल्याने साई भक्तांना अनेक गैरसोयीचा सामना करावा लागत होता. २०१६ साली बिहारचे तत्कालीन राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी पाथरी येथे भेट दिल्यानंतर खऱ्या अर्थाने साईबाबा जन्मभूमीसाठी विकास आराखडा तयार करण्यास सुरुवात झाली. पुढे रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नगर परिषदकडून विकास आराखडा मागवून घेतला. मात्र, युती शासनाच्या पाच वर्षे काळात आणि त्यानंतर महा विकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षे कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटी रुपयांचा आरखड्याची घोषणा केली होती. मात्र तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुरीस मुहूर्तच सापडला नव्हता.
दरम्यान, गतवर्षी राज्यात सत्तांतर झाले शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री शिंदे यांचे निकटवर्तीय शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी पाठपुरावा सुरू केला. छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पालकमंत्री यांची मान्यता घेण्यात आली. तद्नंतर मंत्रिमंडळ बैठकीत ९१ कोटी ८० लाख रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर शासनाने १३ फेब्रुवारी रोजी निधी वितरण बाबत आदेश काढले आहेत. जमिन अधिग्रहण साठी ३९ कोटी रुपये तर ११ कोटी प्रशासकीय खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत. सदरील निधी जिल्हाधिकारी परभणी यांना वर्ग करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजुर करून निधी उपलब्ध करून दिल्याने आता खऱ्या अर्थाने साईभक्ताचे अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण होत आहे.कामाचा पाठपुरावा केला जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते सईद खान यांनी लोकमतला बोलताना दिली.