परभणी : जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेत रविवारी लेखी परीक्षा होणार आहे. शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय केंद्रावर सकाळी ८.३० वाजता परीक्षा सुरु होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना परीक्षेच्या वेळेपूर्वी दोन तास आधी पोहचणे आवश्यक असल्याचे पोलीस दलाने कळविले आहे.
पोलिस दलाकडून पोलिस भरती २०२१ मधील रिक्त असलेल्या ७५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली. यामध्ये सुरुवातीला अर्ज, कागदपत्र पडताळणी, मैदानी चाचणी पूर्ण करण्यात आली. साधारण जानेवारी महिन्यात सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली. यानंतर मागील आठ दिवसांपूर्वी तृतीयपंथी उमेदवारांची मैदानी चाचणी झाली. या सर्व प्रक्रियेतून लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या एक हजार २५ उमेदवारांची यादी पोलिस विभागाने जाहीर केली. या लेखी परीक्षेची तयारी पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. यासाठी अधिकारी, कर्मचारी यांच्या सूध्दा नियूक्त्या केल्या जाणार आहेत.
अडचण असल्यास संपर्क साधापोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना परीक्षेचे प्रवेश पत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. या संदर्भात उमेदवारांना काही अडचण समस्या असल्यास त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष येथे किंवा समक्ष कार्यालयात येऊन पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे.