परभणी : शहरातील जिल्हा स्टेडियम परिसरातील जलतरण तलावात वडिलांसोबत पोहण्यासाठी आलेल्या एका ६ वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना २४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. अभिमन्यू धनंजय टेकाळे असे मयत बालकाचे नाव आहे.
येथील भाग्यनगर भागातील रहिवासी धनंजय टेकाळे आणि त्यांचा मुलगा अभिमन्यू हे दोघेही रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे जिल्हा क्रीडा संकुल परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहण्यासाठी आले होते. पोटाला डमरू बांधून अभिमन्यू हा पोहत होता. तर त्याचे वडील धनंजय टेकाळे हेदेखील या तलावात पोहत होते. याचदरम्यान, अभिमन्यू हा अचानक पाण्यात बुडाला. जलतरण तलावात मुलगा पोहताना दिसत नसल्याचे लक्षात आल्यानंतर धनंजय टेकाळे यांनी आरडाओरड केली. त्यानंतर जलतरणिका परिसरातील काहीजणांनी पाण्यात त्याचा शोध घेतला.
मुलाला पाण्याबाहेर काढून सुरुवातीला खासगी रुग्णालयात आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टरांनी अभिमन्यू टेकाळे हा मृत झाल्याचे घोषित केले. अभिमन्यू हा पाण्यात नेमका कसा बुडाला, हे समजू शकले नाही. दरम्यान, याप्रकरणी नवा मोंढा पोलिसांना माहिती देण्यात आली असून, त्यावरून घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.