लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ४५.६९ कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले आहे. इतर बँका मात्र अजूनही पीक कर्ज वाटपासाठी उदासीन असल्याचे दिसत आहे.खरीप हंगामामध्ये शेतक-यांना आर्थिक हातभार लागावा, या उद्देशाने दरवर्षी बँकांकडून पीक कर्जाचे वाटप केले जाते. जिल्हा प्रशासन वर्षाचा आराखडा तयार करुन प्रत्येक बँकेला पीक कर्जाचे उद्दिष्ट देते. मात्र कर्ज वाटप करताना अनेक अडचणी येतात. शेतक-यांना वेळेत कर्ज मिळत नाही, अशी शेतक-यांची ओरड असते. असे असले तरी काही बँकांनी पीक कर्ज वाटपात समाधानकारक कामगिरी केली आहे. त्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा वरचा क्रमांक लागतो.जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र ग्रामीण बँकेला यावर्षी २००.१४ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले होते. बँकेने ४ जुलैपर्यंत ४५ कोटी ६९ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.जिल्ह्यातील ५ हजार ५४६ शेतक-यांना या कर्जाचा लाभ झाला असून उद्दिष्टाच्या तुलनेत २२.८३ टक्के काम या बँकेने केले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जिल्ह्यात ३७ शाखा असून या शाखांमधून पीक कर्ज वाटपाला प्राधान्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने पीक कर्ज वाटपासाठी जिल्ह्यात योग्य नियोजन केले.परिणामी जास्तीत जास्त शेतक-यांपर्यंत ही बँक पोहचत आहे. ऐन पेरणीच्या वेळेलाच कर्ज उपलब्ध करुन दिल्याने शेतक-यांनाही त्याचा लाभ होत आहे.---जिल्हाभरात ११८ कोटींचे वाटपजिल्ह्यातील ग्रामीण बँक, व्यापारी आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेला १४७० कोटी ४४ लाख १२ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट खरीप हंगामात देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेला १६५ कोटी ४७ लाख रुपये उद्दिष्ट असून या बँकेने १८ हजार ९६५ शेतक-यांना ३६ कोटी ९८ लाख २१ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्ज वाटपाची ही टक्केवारी २२.३५ टक्के एवढी आहे.व्यापारी बँकांना ११०४ कोटी ८२ लाख रुपयांचे उद्दिष्ट असून या बँकांनी केवळ ३ हजार ४६९ शेतक-यांना ३५ कोटी ५३ लाख रुपयांचे (३.२२ टक्के) कर्ज वाटप केले आहे. तर ग्रामीण बँकेला २०० कोटी १४ लाख रुपयांचे उद्दिष्ट असून त्या तुलनेत ४५ कोटी ६९ लाख ७ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. त्याची टक्केवारी २२.८३ एवढी आहे. जी जिल्ह्यातील इतर बँकांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.---महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे पीक कर्जासाठी शेतक-यांची गर्दी होत आहे. ज्या शाखेमध्ये पीक कर्जासाठी अधिक गर्दी होते, त्या ठिकाणी इतर शाखांमधील मनुष्यबळ उपलब्ध करुन शेतक-यांना वेळेत कर्ज वितरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बँकेला दिलेले उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.डी.डी.भिसे, विभागीय व्यवस्थापक, महा.ग्रामीण बँक
परभणी जिल्ह्यात ग्रामीण बँकेकडून सर्वाधिक पीक कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 12:56 AM
महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ४५.६९ कोटी रुपयांचे पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटप केले आहे. इतर बँका मात्र अजूनही पीक कर्ज वाटपासाठी उदासीन असल्याचे दिसत आहे.
ठळक मुद्दे२२.८३ टक्के उद्दिष्ट पूर्ण : शाखानिहाय केले कर्ज वाटपाचे नियोजन