स्टेडियम परिसरात स्वच्छतेची मोहीम
परभणी : येथील जिल्हा स्टेडियम मैदानाच्या परिसरात शनिवारी दिवसभर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रजासत्ताक दिनानिमित्त स्टेडियम मैदानात मुख्य ध्वजारोहण सोहळा होणार आहे. या निमित्ताने मनापच्या वतीने ही मोहीम राबविली जात आहे. या भागातील रस्त्यांवरील धूळ साफ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, स्टेडियम भागातही मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली आहे.
जिल्ह्यता रब्बी हंगामात वाढले सिंचन
परभणी : जिल्ह्यात या वर्षी निम्न दुधना आणि जायकवाडी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध झाले असून, या पाण्याच्या भरवशावर रब्बी हंगामात बागायती पिके घेण्यात आले आहेत. गहू, हरभरा, ऊस या पिकांचे क्षेत्र जिल्ह्यात वाढले आहे. जायकवाडी प्रकल्पातून जिल्ह्यात दोन पाणी आवर्तन देण्यात आले असून, निम्न दुधना प्रकल्पातूनही दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. त्यामुळे या हंगामातील सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे.
नवीन वसाहतीमंध्ये सुविधांचा अभाव
परभणी : शहरालगत नव्याने निर्माण झालेल्या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव निर्माण झाला आहे. रस्ते, पाणी, वीज या समस्या या भागात निर्माण झाल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी काही भागांत जलवाहिनी अंथरण्यात आली असली, तरी अद्याप या जलवाहिनीच्या साह्याने पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्याचप्रमाणे, रस्ते आणि नालीचा प्रश्न कायम आहे.
वाळूची अवैध वाहतूक सुरूच
परभणी : जिल्ह्यातील नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा उपसा केला जात असून, जिल्हा प्रशासनाने वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र, अद्याप वाळू घाट लिलावात सुटले नाहीत. त्यामुळे सद्यस्थितीला जिल्ह्यात खुल्या बाजारपेठेत वाळूचे भाव वाढलेले आहेत. वाळूची चोरून विक्री करण्याचे प्रमाणही कमी होत नसल्याचे दिसत आहे. पोलीस प्रशासन आणि महसूलच्या वतीने वेळोवेळी कारवाई केल्यानंतरही अवैध वाळू उपसा थांबलेला नाही.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त
परभणी : शहरातील विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मुख्य रस्ते खड्डेमय झाल्याने वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वसमत रोड ते सुपर मार्केट या रस्त्याची सध्या अशीच अवस्था झाली आहे. या मार्गावर मोठी वाहतूक आहे. मात्र, खड्ड्यांमुळे वाहन चालविताना कसरत करावी लागते. तेव्हा या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.