परभणी जिल्ह्यात महामंडळाच्या वतीने १५६८ मेट्रिक टन युरिया खत संरक्षित केले असून त्यापैकी जिल्हास्तरीय नियंत्रण समितीने परवानगी दिलेल्या गोदामातून ७०५ मेट्रिक टन युरिया २९ जून रोजी महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक श. ब्य़. राचलावार यांनी शेतकऱ्यांना विक्री करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे सेलू तालुक्यात संजय फर्टिलायझर एजन्सी सेलू यांच्याकडील २०० मेट्रिक टन युरिया खत संरक्षित करून त्यापैकी ७० मेट्रिक टन, तर तिरुपती फर्टिलायझर वालूर यांचे ८० मेट्रिक टन युरिया खत संरक्षित करून त्यापैकी ३० मेट्रिक टन युरिया विक्रीसाठी परवानगी दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना युरिया हवा आहे त्यांनी या गोदामातून युरिया खताची खरेदी करताना तो एमआरपीनुसार खरेदी करावा, तसेच दुकानदाराने पाॅस मशीनचा वापर करूनच खत विक्री करणे बंधनकारक असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. या गोदाम प्रमुखांनी खत निरीक्षकांकडून संरक्षित साठा तपासून घ्यावा, अशाही सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे दुकानदाराने शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध करून द्यावे. मात्र, या युरिया खतासोबत इतर कोणत्याही खताची जबरदस्ती शेतकऱ्यांना करू नये, अशा प्रकारची सूचना कृषी विभागाने दुकानदार यांना दिल्याची माहिती देण्यात आली. खत पेरणीसाठी युरिया उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
१०० मेट्रिक टन युरिया विक्रीस परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 4:12 AM