परभणी : परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राखेची वाहतूक परभणी जिल्ह्यातून करू देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एका खासगी व्यक्तीला नांदेड येथील एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. येथील मोटार वाहन निरीक्षक नागनाथ महाजन यांच्यासाठी लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्याने दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रातून राखेची वाहतूक परभणी जिल्ह्यातून करू देण्यासाठी दोन गाड्यांचे ६ हजार रुपये मागितले जात असल्याची तक्रार नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर या विभागाने १७ नोव्हेंबर रोजी रात्री परभणी शहरातील सुपर मार्केट परिसरातील एका पेट्रोल पंपासमोर सापळा लावला. तेव्हा अनिस खान याने तक्रारदाराकडून ६ हजार रुपयांची लाच स्वीकारली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक नागनाथ महाजन यांच्यासाठी ही लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणी नागनाथ महाजन व अनिस खान गुलाम दस्तगीर खान या दोघांविरुद्ध नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस कर्मचारी जगन्नाथ अनंतवार, अंकुश गाडेकर, ईश्वर जाधव, नरेंद्र बोडके यांनी केली. तपास पोलीस उपअधीक्षक भरत हुंबे हे करीत आहेत.