- रेवणअप्पा साळेगावकरसेलू (जि.परभणी) : जलजीवन कामाचे फोटो का काढले याचा राग मनात धरून सरपंच पती, पुत्रांनी सहा जणांना लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना कुंभारी गावात घडली. यातील जखमी चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. अशोक शिंदे यांच्या उपचारदम्यान जबाबावरून सेलू ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी सरकारी दवाखान्यात उपचारदम्यान आशोक मोकींदराव शिंदे (३२ रा. कुंभारी) यांनी फिर्याद दिली. ३० ऑगस्टला गावातील जलजीवनचे पाईपलाईन खोदकाम सुरू आहे. या कामाचे मोबाइलमध्ये फोटो काढला तेव्हा सरपंचपुत्र किशोर शिंदे याने फोटो का काढला? असे म्हणून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. हे प्रकरण काही जणांनी सायंकाळी मिटविले. नंतर २ सप्टेंबरला सरपंच पती भगवान शिंदे यांच्यासह मुले संतोष, दत्ता, किशोर शिंदे व हनुमान किशनराव गीते हे त्यांचे हातात लोखंडी पाईप घेऊन अशोक शिंदे यांच्या घरासमोर येऊन जलजीवन कामाचे फोटो का काढले म्हणत शिवीगाळ करून, लोखंडी पाईपने, कुऱ्हाडीने मारहाण केली.
दरम्यान भांडत सोडविण्यासाठी आलेली आई शालनबाई शिंदे, भाऊ विलास शिंदे, मामा रामचंद्र मोगल (रा. नागठाणा), निवृती शिंदे, सोपान शिंदे यांनाही जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. ग्रामस्थांनी जखमी अवस्थेत प्रथमोपचारानंतर परभणी सरकारी दवाखान्यात दाखल केले. त्यापैकी शालनबाई शिंदे, सोपान शिंदे, रामचंद्र मोगल, निवृत्ती शिंदे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांचेवर खासगी आय.सी.यू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या फिर्यादीवरून आरोपी भगवान शिंदे, संतोष शिंदे, किशोर शिंदे, दत्ता शिंदे, हनुमंत गीते यांचेविरुद्ध सेलू ठाण्यात ४ सप्टेंबरला मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे. पोउपनि अशोक जटाळ हे तपास करीत आहेत.
पोनि. म्हणतात आरोपी अटक झाल्यावर कळवतोशनिवारी कुंभारीत प्राणघातक हल्ला झाला. त्यातील सहा गंभीर जखमींवर परभणीत उपचार सुरू आहेत. एमएलसी जबाबावरून सेलू ठाण्यात ४ सप्टेंबरला ५ जणांवर गुन्हा दाखल झाला. या मारामारीचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला. याबाबत पोनि. समाधान चवरे म्हणतात रुग्णांचे स्टेटमेंट घेतले जात आहेत आरोपींना अटक झाली की कळवतो. लाखो रुपयांच्या जलजीवन कामासाठी नियुक्त केलेले कंत्राटदार वेगळे, काम करणारे उपठेकेदार वेगळे अशी स्थिती पुढे येत आहे. याशिवाय ग्रामसेवक, सरपंचापासून ते वरिष्ठांपर्यंतच्या टक्केवारीत ही योजना आडकली आहे. त्यामुळे या कामांकडे जो लक्ष देईल त्याला नीट करण्याची प्रवृत्ती पुढे येत आहे. असाच प्रकार कुंभारी येथे पुढे आला आहे.